कृत्रिम बुद्धिमत्ता अन् मशीन लर्निंगवर भर
एमएसएमई (सुक्ष्म, लघू अन् मध्यम उद्योग) क्षेत्रासाठीची तरतूद आता दुप्पट झाली आहे. एमएसएमईसाठी नव्या व्यवस्था करण्यात येणार आहेत. या क्षेत्राला विकसित करण्यासाठी 15,700 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात या क्षेत्राकरता 7572 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या क्षेत्रात आता ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग’वर भर देण्यात येणार आहे. तसेच छोटय़ा कंपन्यांसाठी पेड-अप भांडवल मर्यादा वाढविली जाणार असल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्रातील मोदी सरकार पुढील काही वर्षांमध्ये एमएसएमई क्षेत्रात 5 कोटी रोजगार निर्माण करण्याच्या लक्ष्यासह वाटचाल करत आहे. एमएसएमईचे योगदान विद्यमान 30 टक्क्यांवरून वाढवत 40 टक्के करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. तर एमएसएमईची निर्यातीतील भागीदारीही 48 टक्क्यांवरून 60 टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. एमएसएमई क्षेत्रावर महामारीचा मोठा प्रभाव पडला असल्याने सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. छोटय़ा कंपन्यांसाठी पेडअप कॅपिटल मर्यादा वाढविण्यात येणार आहे. आत्मनिर्भर भारत आणि लोकल फॉर लोकल योजनेवर भर देण्याचे म्हटले गेले आहे. यातून एमएसएमईला नवी ऊर्जा प्राप्त होणार आहे.









