एअरबस, बोइंगसोबत अब्जावधी डॉलर्सचा ऐतिहासिक करार
वृत्तसंस्था / मुंबई
एअर इंडिया अब्जावधी डॉलर्सचा ऐतिहासिक करार करणार आहे. एअर इंडियाकडून एअरबस आणि बोइंग या कंपन्यांसोबत अब्जावधी डॉलर्सची 500 विमाने खरेदी करण्यासाठी करार केला जाणार आहे. विमाननिर्मात्या कंपन्यांसाठी ही मोठी आणि ऐतिहासिक ऑर्डर ठरणार आहे.
टाटा समुहाच्या अंतर्गत हा एक महत्त्वाकांक्षी क्यवहार होणार आहे. एअर इंडियाला विमानोड्डाण क्षेत्रात मोठे स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने टाटा समूह पावले उचलत आहे. या ऑर्डरमध्ये 400 हून अधिक नॅरो-बॉडी जेट आणि 100 किंवा त्याहून अधिक वाईड-बॉडीयुक्त विमाने खरेदी केली जाणार आहेत, यात एअरबस ए350 आणि बोइंग 787 आणि 777 सामील असेल. पुढील काही दिवसांमध्ये या कराराला अंतिम स्वरुप दिले जाणार आहे. या ऐतिहासिक खरेदीविषयी एअरबस आणि बोईंग यांच्यापैकी कुणीही टिप्पणी करण्यास नकार दिला आहे.









