पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
गांधीनगर / वृत्तसंस्था
गुजरात निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर भूपेंद्र पटेल पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या तयारीत आहेत. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत दुपारी 2 वाजता गांधीनगर येथील नवीन सचिवालयाजवळील हेलिपॅड मैदानावर आयोजित समारंभात भूपेंद्र पटेल यांना राज्याचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून पदाची शपथ देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवार, 12 डिसेंबर रोजी ते भव्य-दिव्य समारंभात शपथबद्ध होतील. या सोहळय़ाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. शपथविधीपूर्वी सकाळी 10 वाजता गांधीनगर येथील लीला हॉटेलमध्ये भाजप आमदारांची बैठक होणार आहे. भूपेंद्र पटेल यांच्यासोबत काही मंत्रीही शपथ घेण्याची शक्मयता आहे. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांची ही सलग दुसरी टर्म आहे.









