8 जागांसाठीची परवानगी रद्द – स्थळ निश्चित करणार प्रशासकीय समिती
वृत्तसंस्था/ गुरुग्राम
हरियाणाच्या गुरुग्राम शहरात खुल्या जागेत नमाज पठण करण्यास विरोध झाल्याने जिल्हा प्रशासनाने 8 जागांसाठीची परवानगी रद्द केली आहे. आता कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी आणि खुल्या जागेवर नमाजासाठी प्रशासनाकडून पूर्व अनुमती घेणे आवश्यक आहे. तर खुल्या जागेत नमाज पठण करण्यासाठी ठिकाणांची ओळख पटविण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी एका समितीची स्थापना केली आहे.
हिंदुत्ववादी संघटना आणि स्थानिक लोकांनी खुल्या जागेत नमाज पठण करण्यास विरोध दर्शविला होता. तर ज्या ठिकाणी नमाज पठण केले जाते, तेथे यामुळे कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही, घटनेत शांतेने कुठल्याही धर्माच्या लोकांना स्वतःच्या धार्मिक क्रिया सुरू ठेवण्याचा अधिकार असल्याचे नागरिक एकता मंचच्या पदाधिकाऱयांचे म्हणणे होते.
स्थानिकांचा विरोध
स्थानिक नागरिक आणि अनेक संघटनांच्या विरोधानंतर गुरुग्राम जिल्हा प्रशासनाने शहरात 8 ठिकाणांसाठी देण्यात आलेली परवानगी रद्द केली आह. अन्य ठिकाणी देखील लोकांनी आक्षेप घेतल्यास तेथेही बंदी घातली जाऊ शकते असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
समितीची स्थापना
जिल्हाधिकारी यश गर्ग यांनी नमाज पठण करण्यासाठीच्या ठिकाणांची ओळख पटविण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीत अतिरिक्त जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, हिंदू अन् मुस्लीम संघटनांचे सदस्य तसेच सामाजिक संघटनांना सामील करण्यात आले आहे. कुठलाही रस्ता किंवा सार्वजनिक स्थळी नमाज पठण होणार नाही हे समितीकडून सुनिश्चित केले जाणार आहे.
प्रशासनाची सहमती आवश्यक
कुठल्याही सार्वजनिक किंवा खुल्या ठिकाणी नमाज पठणासाठी प्रशासनाची सहमती आवश्यक असल्याचे गुरुग्राम पोलिसांचे प्रवक्ते सुभाष बोकेन यांनी म्हटले आहे. भविष्यात सामूहिक प्रार्थनेसाठी कुठल्या जागांचा वापर करावा हे समिती ठरविणार आहे.









