कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती, भरगच्च वेळापत्रकामुळे एसीसीने घेतला निर्णय
वृत्तसंस्था / दुबई
यावर्षी होणारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा 2023 पर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय आशियाई क्रिकेट कौन्सिलने घेतला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक स्पर्धांच्या वेळापत्रकात वारंवार बदल करावा लागत असून क्रिकेटचा भरगच्च कार्यक्रम पाहून आशिया चषक स्पर्धा आता 2023 मध्ये आयोजित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला गेला आहे.
यावर्षीच होणारी ही स्पर्धा आधी पाकिस्तानमध्ये घेतली जाणार होती. पण नंतर ती लंकेमध्ये घेण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र लंकेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून यावेळी ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत या स्पर्धेत सहभागी होणाऱया भारत, पाक, लंका, बांगलादेश यांचे भरगच्च कार्यक्रम असल्याने आशिया चषकासाठी विंडो मिळविणे खूपच कठीण जाणार होते. या सर्व बाबींचा विचार करून आशियाई क्रिकेट कौन्सिलने (एसीसी) या संदर्भात निवेदन दिले आहे. ‘एसीसी मंडळाने सर्व बाबींचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यानंतर ही स्पर्धा लांबणीवर टाकणे हा एकच पर्याय असल्याचे आम्हाला दिसून आले,’ असे या पत्रकात म्हटले आहे.
वेळापत्रकानुसार 2022 मध्ये आशिया चषक स्पर्धा होणार असल्याने या वर्षीची स्पर्धा 2023 मध्येच घेण्याचे ठरविण्यात आले. तसेच यावर्षी भारतात टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार असल्याने त्याआधी आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करावे लागले असते, ते खूपच घाईचे आणि अडचणीचे ठरले असते. 2018 नंतर आशिया चषक स्पर्धा झालेली नाही. 2020 मध्ये ती घेण्याचे ठरविण्यात आले होते. पण कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे ती लांबणीवर टाकावी लागली होती.
‘केव्हिड 19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आशिया चषक स्पर्धा याआधी लांबणीवर टाकण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला होता. तेव्हापासून एसीसीने यावर्षी या स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रयत्न सुरू केले होते. पण एफटीपीच्या भरगच्च वेळापत्रकामुळे यात सहभागी संघ उपलब्ध होऊ शकतील, असा विंडोच मिळत नसल्याने ही स्पर्धा 2023 पर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घ्यावा लागला,’ असेही एसीसीने निवेदनात म्हटले आहे. आशिया चषक स्पर्धा दर दोन वर्षांनी भरविली जाते. भारताने आशिया चषकाच्या मागील दोन स्पर्धा जिंकल्या आहेत.









