आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप – सात महिलांना उपांत्य फेरीत स्थान
वृत्तसंस्था/ दुबई
ऑलिम्पिकपात्र बॉक्सर्सच्या तयारीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेल्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपला सोमवारपासून येथे सुरुवात झाली आहे. मात्र स्पर्धकांची संख्या कमी असल्याने ड्रॉ काढल्यानंतरच भारताची पदके निश्चित झाली आहेत. भारताच्या सात महिला बॉक्सर्सना उपांत्य फेरीत स्थान मिळाले आहे.
सहावेळची वर्ल्ड चॅम्पियन एमसी मेरी कोम (51 किलो गट), पूजा रानी (75 किलो), अनुपमा (81 किलोवरील), सवीती (81 किलो), लवलिना बोर्गोहेन (69 किलो), लालबुआतसैही (64 किलो) व मोनिका (48 किलो) यांना रविवारी ड्रॉनंतर उपांत्य फेरीत प्रवेश देण्यात आला. या स्पर्धेतील दहा विविध वजन गटात मिळून एकूण 47 महिला बॉक्सर्सनी भाग घेतला आहे. भारताने या स्पर्धेसाठी एकूण 19 बॉक्सर्सचे पथक पाठविले असून त्यात 9 पुरुष व 10 महिला बॉक्सर्सचा समावेश आहे. या स्पर्धेत विजेत्यांना नियमित बक्षिसाबरोबर बोनस बक्षीसही दिले जाणार आहे.
या स्पर्धेत एकूण 27 देश भाग घेतील अशी अपेक्षा होती. पण रविवारी केवळ 17 देशच सहभागी झाले असल्याचे स्पष्ट झाले. कोव्हिड 19 मुळे प्रवासांवर निर्बंध घालण्यात आले असल्याने अनेक देशांनी त्यातून माघार घेतली आहे. भारताच्या अमित पांघलसह (52 किलो गट) एकूण सहा पुरुष बॉक्सर्सना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाल्याने त्यांना उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळाले आहे. या स्पर्धेच्या मागील आवृत्तीत भारताने सर्वाधिक 13 पदके मिळवित आजवरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. यावेळी त्यात आणखी सुधारणा करण्याची अपेक्षा हाय परफॉर्मन्स डायरेक्टर सांतियागो नीव्हा यांनी केली आहे. 64 किलो वजन गटात खेळणाऱया शिवा थापाने आतापर्यंत चार पदके मिळविली असून तो आता सलग पाचवे पदक मिळविण्याच्या मार्गावर आहे.









