लॉकडाऊन, जिल्हाबंदीच्या काळात हे प्रकर्षाने आठवते आहे. ऐंशीच्या दशकात पुणे-मुंबई-पुणे प्रवास देखील महिनाअखेरीस न परवडणारी गोष्ट होती. स्वस्त आगगाडीचे तिकीट 8 रुपये होते. बचतीचा एक प्रसंग आठवतो. माझी पहिली कादंबरी प्रकाशित झाली तेव्हा तिची पहिली प्रत जयवंत दळवी यांना स्वतः देण्यासाठी पैसे वाचवायचे म्हणून रात्रीच्या पॅसेंजरने गेलो. पहाटे दादरला पोचल्यावर फलाटावर कुडकुडत-पेंगत सकाळ होईतो थांबलो.
युनियनच्या कामासाठी मुंबईला युनियनच्या खर्चाने जायला मिळायचे. नेते रिटर्न-तिकीटासाठी सोळा रुपये व चहापाण्यासाठी पाच रुपये द्यायचे. दादरला उतरल्यावर वडा-पाव खाऊन सेंट्रल ऑफिसला जाऊन तिथले नेते श्रीपाद काशीकर यांच्याकडे कागदपत्रे द्यायची-घ्यायची. ते कॅण्टीनमध्ये नेऊन पोटभर खाऊ घालीत. दिवसभर मुंबईत भटकंती. रात्री जेवण व मुक्काम बोरीवलीला काशीकरांच्या घरी. पहाटे उठून पुण्याला परत.
ऐंशी साली लग्न झाले. दादरला साडू-मेव्हणीचे घर होते. मित्र प्रमोद कुलकर्णी दादरलाच खांडके चाळीत रहायचा. प्रमोदचा बॉस बर्वे आणि मी प्रमोदच्या खोलीत मुक्कामाला असायचो. चाळीतला आणखीन एक मित्र संज्या कारखानीस सोबत असे. गोमंतक नावाच्या हॉटेलसमोर रांग लावून सामिष भोजनाचे पार्सल घेऊन रूमवर येणे आणि जेवल्यावर समुद्रकिनारी फिरायला जाणे ही आनंदाची परमावधी होती. काही दिवसांनी साडू घाटगे, प्रमोद, संजय आणि मी अशा चौघांची छान चौकडी जमली.
ऐंशीचे दशक संपत आले. घरात लहान मुलं आली. संजय अकाली गेला. प्रमोदची पुण्याला बदली झाली. पुणे-मुंबई प्रवासाचे अप्रूप संपले. पण आनंदाचे तुकडे शिल्लक होते. मुंबईत काम निघाले की आधी साडूच्या घरी ट्रंक कॉल करायचो. सकाळी आगगाडीत (सोया)बीन्स नावाची चमचमीत प्लेट आणि उतरल्यावर आयडियलजवळ जाऊन श्रीकृष्णचा बटाटे वडा किंवा पोहे घातलेला सामोसा खाऊन साडूंच्या घरी. तिथे विश्रांती घेऊन बाहेरचे काम उरकून संध्याकाळी परतीच्या टेनने पुणे. या वेळी बॅगमध्ये मेहुणीने आधल्या रात्री तयार आणि फ्रोजन केलेले ताजे ओले मसाले, दादरच्या कच्छी महिलांच्या दुकानातल्या कचोरी, खांडवी वगैरे पदार्थ असत. ते खात खात पुणे येई. आगगाडीत पारसी-डेअरीची कुल्फी विकायला येई. ती घेणे, ती विरघळू नये म्हणून पुण्याला पोचल्यावर घाईने रिक्षा पकडून घरी आल्यावर फ्रिजमध्ये ठेवणे आणि रात्री जेवण झाल्यावर बायको-मुलांसह मिटक्मया मारीत खाणे हा आनंदसोहळा होता. गेले ते दिवस… त्याला कितीतरी वर्षे झाली.








