वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2022 सालातील आशियाई चषक महिला फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद मुंबई आणि पुणे शहर भूषविणार आहे. यापूर्वी सदर स्पर्धा भुवनेश्वर आणि अहमदाबाद या शहरामध्ये घेण्याचा निर्णय झाला होता. पण स्पर्धकांना प्रवासातील कालावधी कमी असावा या हेतूने या स्पर्धेचे ठिकाण बदलण्यात आल्याची माहिती आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनने दिली आहे.
या स्पर्धेसाठी मुंबई येथील अंधेरी क्रीडा संकुल तसेच पुण्यातील बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलाची निवड करण्यात आली आहे. भारतामध्ये सध्या कोरोना महामारीचे वातावरण असल्याने येणाऱया समस्यांची दखल घेवून सर्व काटेकोर नियम अंमलात आणले जातील, असे सांगण्यात आले आहे. 2022 साली होणाऱया एएफसी महिलांच्या आशियाई चषक स्पर्धेतील सामन्यांसाठी तीन स्टेडियम्स उपलब्ध करून देण्यात आली असून त्यात नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील स्टेडियमचा समावेश आहे. या स्टेडियमची क्षमता जवळपास 38,000 प्रेक्षकांची आहे. सदर स्पर्धा 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2022 दरम्यान होणार आहे.
या स्पर्धेच्या ठिकाणामध्ये बदल करण्याचा निर्णय एएफसीने घेतला. कारण फुटबॉलपटूंना केवळ प्रवासात अधिक वेळ जाऊ नये, त्याचप्रमाणे कोरोना महामारी स्थितीचा गंभीर विचार करून स्पर्धेच्या ठिकाणात बदल करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे तसेच स्थानिक आयोजन समितीचे प्रमुख प्रफुल पटेल यांनी दिली. या स्पर्धेवेळी जैविक सुरक्षित वातावरणाला अधिक प्राधान्य दिले जाईल. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या शहरामध्ये फारसे अंतर नसल्याने फुटबॉलपटूंना प्रवासासाठी जास्त वेळ खर्च करावा लागणार नाही. ओडिशा तसेच गुजरात राज्यांनी या स्पर्धेचे यजमानपद स्वीकारण्याची तयारी यापूर्वी दर्शविली होती. सदर स्पर्धेमध्ये यजमान भारत, जपान, ऑस्ट्रेलिया, चीन या देशांनी यापूर्वीच फायनल्समधील आपले स्थान निश्चित केले आहे. अ गटामध्ये चीन तैपेई, बहरीन, तुर्कमेनिस्तान, लाओस तर ब गटामध्ये व्हिएतनाम, ताजिकिस्तान, मालदीव आणि अफगाण यांचा समावेश आहे. आतापर्यंत तीनवेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळविणारा दक्षिण कोरिया, सिंगापूर, इराक, इंडोनेशिया आणि म्यानमार यांचा क गटात आणि संयुक्त अरब अमिरात, गुआम, लेबनॉन यांचा ड गटात समावेश आहे.









