नीमा तुला सांगते, आजच्या काळात लग्न टिकणं कठीण’
नीमा- ‘का? काय झालं?’
‘काही नाही गं.. हल्लीच्या मुली फार बोलतात बघ. काही ताळतंत्रच नाही असं वाटत कधी कधी.’
‘म्हणजे?’
‘माझी सून गं.. परवा माझ्या नातवाच्या क्लाससंदर्भात पालकांची मिटींग होती. तिला अटेंड करायला जमणार नाही असं म्हणाली होती ती. पण रोहितही गेला नाही. झालं.. कौस्तुभला टीचर ओरडल्या. ही घरात येताक्षणी तो तक्रार करायला लागला. मग वाद सुरू झाला. जोरात भांडण झालं. रोहित म्हणाला, ‘मी नाही तुला नोकरी करायला सांगितली. तुझी हौस म्हणून करतेस. जमत नसेल तर सोडून दे नोकरी. बरंच काही झालं. मी काही बोलले नाही पण आपणही केल्याच की गं नोकऱया. पण यांच्यासारखं नाही केलं!! मलाही वाटलं जमत नसेल तर सोडून द्यावी नोकरी तिनं. काय अडणार आहे?’
नीमा-‘वीणा काय बोलतेयस तू?’
‘काय चुकीचं बोलतेय सांग की..’
‘हे बघ..तुझी खरी मैत्रिण आहे म्हणून सांगते. तुझं हे बोलणं मला अजिबात आवडलं नाही. अगं..ऑफिसमधेही खूप वर्कलोड असतं. डबल डय़ूटी करणं सोपं नाही हे अनुभवलंय ना आपणही?’
वीणा-‘हो पण ‘जेंडर रोल’चा पगडा आता काही पूर्वीसारखा राहिला नाही.
नीमा-‘तू असं जरी म्हटलंस तरी प्रामाणिकपणे सांग.. किती स्त्रिया अशा आहेत ज्यांना घरात आल्यावर प्रेश होताक्षणी हातात चहाचा कप मिळतो? घर आवरलेलं असतं, छान स्वयंपाक तयार असतो? बाकीच्यांचं जाऊ दे.. तुझ्या मुलाने बायकोही थकून येते म्हणून आपुलकीनं कधी चहाचा कप कितीवेळा दिलाय हातात तिच्या, सांग ना?’
वीणा-‘अगं हो. पण आपण हे केलंच ना?’
नीमा-‘आपण हे केलं खरं..पण तीच ‘री’ पुढच्या पिढीने जशीच्या तशी ओढायची का? आपल्यालाही काहीवेळा खूप वैताग यायचाच ना? आठव जरा.’
नाही जमत तर नोकरी सोडून दे.. हा कुठचा सल्ला? त्यापेक्षा सगळय़ांनी तिला समजून घ्या, कामात मदत करा. नसेल जमत तर मेड ठेवा.. वीणा, तुझ्याकडून ही अपेक्षा नाही. माझी सून अगदी मोठ्ठय़ा पोस्टला आहे हे भिशीच्या ग्रुपमधे अगदी अभिमानाने सांगतेस आणि प्रत्यक्षात मात्र तिने घरी आल्यावर आदर्श सून, पत्नी, आई या साच्यात फिट्ट बसायला हवे, हा हट्ट? तिला नाही जमली मिटींग अटेंड करायला तर तू जायचं. नाहीतर तुझ्या लेकाला सांगायचं आणि तुझा लेक कोण एवढा टेकोजीराव गं? नोकरी सोडून दे सांगणारा? अशावेळी तू त्याचा खरमरीत समाचार घ्यायला हवास. पैशाची गरज असेल नसेल हा पुढचा भाग…पण तिच्या बुद्धीची काही गरज आहे की नाही, मानसिक समाधान ही गरज नाही का? अगं आपण आपल्या मुलांना जसं शिकवलं अगदी तसंच पैसे खर्च करून, परिश्रम घेऊन तिच्या पालकांनी तिलाही शिकवलंय. तिनेही अभ्यास करतच यश मिळवलंय ना? मग केवळ पिढय़ान् पिढय़ा सगळं घरातलं काम तिनेच करायचं हे चालत आलं आहे. तो पगडा आजही मनावर आहे म्हणून तिनेच सगळं पहायला हवं. घरी येताक्षणी अगदी गुणी, आदर्श सून, पत्नी, आई या भूमिकेतच वावरायला हवं या अपेक्षेचा मूर्खपणा कधी थांबवणार आपण? तुला दुखावण्याचा हेतु नाही परंतु मला जे वाटतं ते स्पष्ट बोलले इतकंच..’
दोन मैत्रिणींमधे पार्किंगमधे चाललेला हा संवाद बरंच काही सांगणारा होता. हा संवाद ऐकून मला त्या दिवशी भेटायला आलेली अनिशा आठवली. तसा तिचा आणि माझा अनेक वर्षांचा परिचय. अतिशय हुशार, उच्चशिक्षित अनिशाने अगदी घरातल्यांच्या पसंतीनुसार विवाह केला. दीड वर्ष जेमतेम चांगले गेले परंतु नंतर मात्र घर आणि ऑफिस सांभाळताना तिची दमछाक होऊ लागली. ऑफिसमधे तिथले वर्कलोड आणि घरी रोजच्या कामांची धावपळ. सुरुवातीला लग्न नवीन आहे. बोलायचे कसे? थोडे दिवस जाऊ देत असा विचार करत जोवर अनिशा अगदी विनातक्रार सारे काही करत होती तोवर सारे सुरळीत सुरू होते परंतु जसजशा कामाच्या धावपळीत काही गोष्टी राहू लागल्या, तशा तक्रारी सुरू झाल्या. सासरी असलेला ‘जेंडर रोल’चा पगडा एवढा जबरदस्त होता की नवऱयाने मदत करायचा विचार करणे हा गुन्हाच मानला जावा. घरात मेड ठेवावी तरीही. ‘आम्ही कधी असं नाही केलं’ची री…अनिशाला सारे हळूहळू कठीण होऊ लागले आणि नातं तुटण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
मीनाक्षीची कथाही अशीच काहीशी..उच्चशिक्षित मीनाक्षी अत्यंत हौशी आणि कर्तृत्ववान..बढती होऊ लागली आणि ऑफिसच्या कामाचा पसारा वाढू लागला. घर, जबाबदाऱया, मुले, शाळा, अभ्यास आणि ऑफिस हे करत असताना दमणूक होऊ लागली. कितीही मोठय़ा पदावर काम करत असली तरी घरी आल्यावर निमूटपणे काम करावं लागे. नाहीतर एवढी दमणूक होते तर खुशाल सोडून द्यावी नोकरी. हे तिला ऐकायला मिळत असे. मीनाक्षी मला म्हणाली, ‘मॅडम, यांना कोण सांगणार की मला ऑफिसच्या कामाने नाही तर घरची रोजची आवराआवर, स्वयंपाक, चहापाणी, पाहुणे, कामवालीच्या दांडय़ा या सगळय़ांनी दमायला होते. यांना वेगळय़ा पद्धतीने समजावून झाले, पण उपयोग शून्यच..‘थकले मी’ हे म्हणण्याची मुभाच नाही मला. शारीरिक दमणूक आणि मानसिक तणाव. अशा नाजुक मनःस्थितीमधे ती भेटायला आली होती.
मुळातच विवाहसंस्था आणि त्या अनुषंगाने उद्भवणाऱया असंख्य समस्या आपण सारेच पाहतो आहोत. अर्थात वैवाहिक नात्याचा प्रवास घटस्फोटाच्या दिशेने होण्याची असंख्य कारणे सांगता येतील. परंतु त्यातले अलीकडच्या काळात सातत्याने समोर येणारे एक कारण म्हणजे आजच्या काळातही असलेला ‘जेंडर रोलचा’ पगडा!
आजही अनेक कुटुंबांमध्ये स्त्रीच्या कामातले शेअरिंग हा कळीचा मुद्दा ठरताना दिसतो. मुलींनी बदलायला हवं किंवा हल्लीच्या मुली अशाच..अशी टीका सर्रास होताना पहायला मिळते. परंतु आपण अगदी खूप आधुनिक आहोत असे म्हणत असताना आजच्या काळातही घर आणि नोकरी किंवा व्यवसाय सांभाळत असताना ‘तिच्या’ रोजच्या कामामधे तिला किती मदत केली जाते किंवा समजा तिने हे मोकळेपणाने सांगितले तर ती टीकेची धनी होते हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. कुटुंबाचे आर्थिक स्थैर्य हा भाग एका बाजूलाच परंतु तिला स्वतःच्या समाधानासाठी, स्वतःचे ज्ञान वाढविण्यासाठी, आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आपण जे काही शिकलो आहोत त्याचा उपयोग करण्यासाठी काम करायला आवडते आणि तो तिचाही अधिकार आहे, हक्क आहे हे प्रामाणिकपणे स्वीकारणारी आणि त्या दृष्टीने तिला मनापासून सपोर्ट करणारी कुटुंबं तशी क्वचितच पहायला मिळतात. आजच्या काळात लगीन गाठ जुळायची असेल आणि ती पक्की करायची असेल तर काही गोष्टींवर विचार करणे आवश्यक आहे. अर्थात हे सारे एकाच लेखामध्ये मांडणे शक्मय नाही, त्यामुळे याविषयी अधिक जाणून घेऊया पुढच्या लेखात..
Ad. सुमेधा देसाई&, मो.94226 11583








