कोरोनाच्या दुसऱया लाटेत अडकलेल्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हय़ाना लाटेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हे दोन्ही जिल्हे रेडझोनमध्ये आहेत आणि चौथ्या टप्यातच आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील कोविडचे निर्बंध आहेत तसेच आहेत.
राज्यातील बहुतांश जिल्हय़ात कोरोनाची दुसरी लाट ओसरून तिसऱया लाटेचा सामना करण्याच्या तयारीला लागलेले असताना कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दोन्ही जिल्हे अजूनही दुसऱया लाटेतच अडकलेले आहेत. कोरोना रुग्णवाढ थांबता थांबेना कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी तरी कारण मीमांसा करून उपाययोजना करणे अपेक्षित आहे.
राज्यातील इतर जिल्हय़ात लवकर आलेली कोरोनाची दुसरी लाट कोकणात उशिराने आली असली तरी मे महिन्यातच बहुतांश जिल्हय़ात कोरोनाची लाट ओसरली आणि रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हय़ात मात्र जून महिना संपला तरी कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नाही. थोडय़ाफार प्रमाणात रुग्णसंख्येत घट झाली आहे मात्र ओसरलेली नाही. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्हय़ाचा पॉझिटिव्हीटी दर 8 ते 13 टक्केच्या आसपास आहे, तर मृत्युदर अडीच टक्केच्या आसपास आहे. या दोन्ही जिल्हय़ाचा पॉझिटीव्हीटी दर 5 टक्केच्या खाली येत नाही तोपर्यंत कोरोनाची दुसरी लाट ओसरली म्हणता येणार नाही. रुग्ण संख्येत घट होत असली तरी फार धिम्या गतीने होत आहे. त्यामुळे दोनही जिल्हे कोरोनाच्या दुसऱया लाटेतच अडकलेले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हय़ाची आजची स्थिती पहिली तर कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 43 हजारापर्यंत गेली आहे तर एक हजारावर मृत्यू झाले आहेत. रत्नागिरी जिल्हय़ात 64 हजारापर्यंत कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या गेली असून कोरोनाने मृत्यूची संख्या 1800 पर्यंत गेली आहे. ही संख्या इतर जिल्हय़ाच्या तुलनेत रुग्ण जास्तच आहेत.कोरोनाची दुसरी लाट ओसरलेल्या जिल्हय़ांनी तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. बालरोगतज्ञाची उपलब्धता, पुरेसा ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध ठेवणे, स्वतंत्र बालरुग्णालय सुरू करणे याची तयारी सुरू आहे. मात्र कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्हासुद्धा कोरोनाची दुसरी लाट रोखण्याची लढाई लढत आहेत. ही लढाई संपलेली नसताना कोरोनाच्या तिसऱया लाटेचे संकट येत आहे. दोन्ही जिल्हय़ात कोरोना नियंत्रणासाठी सर्व प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेने प्रचंड मेहनत घेतली. परंतु मनुष्यबळ आणि आरोग्य सुविधांची कमतरता निश्चितपणे जाणवत आहे, डॉक्टराची कमतरता आहे. फिजिशियनसारखे तज्ञ डॉक्टर नाहीत नर्स व आरोग्य सेवेतील इतर कर्मचाऱयाची पदे मोठय़ा प्रमाणात रिक्त आहेत. सिंधुदुर्ग जिल्हय़ात पुणे येथून टास्क फोर्समार्फत चार डॉक्टर पाठविले तेही 15 दिवसासाठी त्यामुळे डॉक्टरांची कमतरता आहेच. कोरोनाच्या दुसऱया लाटेत समाधानाची एक बाब म्हणजे दोन्ही जिल्हे ऑक्सिजन उपलब्धतेमध्ये स्वयंपूर्ण झाले. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर वाढले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱया लाटेत ऑक्सिजनची कमतरता पडणार नाही. परंतु इतर आरोग्य सुविधांची कमतरता अजूनही आहेच. दुसरी लाट रोखताना दमछाक झाल्यानंतर होम आयसोलेशनमध्ये दाखल असलेले रुग्ण कोविडचे नियम पाळत नसल्याने कोरोनाचा संसर्ग होत असल्याचा निष्कर्ष काढून होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेऊन ग्रामविलगीकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु आजची परिस्थिती पाहिली तर फार कमी प्रमाणात ग्रामविलगीकरण कक्ष सुरू केले आहेत. बहुतांश रुग्ण आजही होम आयसोलेशनमधेच आहेत, अशी परिस्थिती असताना कोरोनाच्या तिसऱया लाटेचा सामना करताना अजून बरीच तयारी करावी लागणार आहे. कोकणातील दोन्ही जिल्हय़ात दुसऱया लाटेत आलेले अनुभव लक्षात घेऊन दोन्ही जिल्हय़ाच्या मंत्र्यांनी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी जोरदार तयारी करायला हवी. विशेष करून लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालय, आयसीयू वॉर्ड, बालरोगतज्ञ उपलब्ध केले तर निश्चितच तिसऱया लाटेचा सामना समर्थपणे करता येईल.
गत वषी गणेशोत्सव कालावधीमधेच ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढली होती. या वषी तर कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नसताना आता गणेशोत्सवात जिल्हय़ाबाहेरून येणाऱया चाकरमान्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱया लाटेची मोठी झळ बसली आणि तिसऱया लाटेत तर मुलांना धोका असल्याने गंभीर परिस्थिती उद्भवल्यास राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन संकटाला तोंड दिल्यास कोरोनाची तिसरी लाट परतवून लावण्यास यश मिळू शकते. त्यापूर्वी कोरोनाच्या दुसऱया लाटेत अडकलेल्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हय़ाना लाटेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
कोरोनाच्या दुसऱया लाटेत अडकलेले दोन्ही जिल्हे रेडझोनमध्ये आहेत आणि चौथ्या टप्यातच आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील कोविडचे निर्बंध आहेत तसेच आहेत. आता तर राज्य शासनाने ज्या ग्रामपंचायत किंवा शहरी क्षेत्रात रुग्ण नाहीत अशा ठिकाणी शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेत आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली आहे. आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यास स्थानिक स्तरावर निर्णय घ्यायचा आहे, असे असले तरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ात अजून तरी कोरोनाची परिस्थिती निवळलेली नाही. त्यामुळे सद्यस्थितीत शाळा सुरू करणे जोखमीचेच ठरू शकते.
कोकणात तर सद्यस्थिती पाहिल्यास दुसरी लाट ओसरलेली नसताना आणि तिसरी लाट येण्याची शक्मयता वर्तवलेली असताना सद्यस्थितीत शाळा सुरू होणे कठीण आहेत. गणेशोत्सव झाल्यानंतर आणि तिसरी लाट येऊन गेल्यावर किंवा या लाटेचा काही परिणाम नसेल तर शाळा सुरू करता येणे शक्मय आहे. त्यामुळे हे सर्व करत असताना सर्वप्रथम कोरोनाची दुसरी लाट संपवून तिसऱया लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्जता हवी तरच आगामी काळात कोकण कोरोनावर मात करण्यात यशस्वी ठरेल.
संदीप गावडे








