आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे प्रतिपादन :अडवई येथे मेगा मेडिकल कॅप्मला प्रतिसाद
प्रतिनिधी/ वाळपई
राज्याच्या शेवटच्या टोकापर्यंत आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठी येणाऱ्या काळामध्ये आरोग्य खात्यातर्फे सत्तरी व सांगे तालुका दत्तक घेण्यात येणार आहे. याद्वारे ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आधुनिक सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न केली जातील.
सत्तरी तालुक्याप्रमाणे सांगे तालुकासुद्धा ग्रामीण आहे. सदर भागात आरोग्य खात्यातर्फे चांगल्या सुविधा उपलब्ध केल्या जातील. यामुळे हा तालुका आरोग्य खाते दत्तक घेणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. भिरोंडा पंचायत क्षेत्रातील अडवई येथे आयोजित मेगा मेडिकल कॅम्पच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सत्तरी तालुका सुद्धा दत्तक घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
15 एप्रिलपर्यंत गोव्यामध्ये कॅन्सर ओपीडी सुरू करणार
कर्करोगासारख्या ऊग्णांना उपचारासाठी मुंबईसारख्या शहरांमध्ये जावे लागते. यामुळे अनेक प्रकारचे अडचणी निर्माण होत असतात. अनेक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुदृढ नसते. यामुळे गारिबांना तेथे जाऊन उपचार घेणे परवडणारे नाही. यामुळे 150 कोटी खर्चून गोव्यामध्ये कर्करोग इस्पितळाची उभारणी करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिले.
सॅटॅलाइट ओपीडीमुळे सर्वसामान्यांना लाभ
गोव्याचे अनेक तालुके आजही पणजी सारख्या शहरापासून लांब आहेत. सदर भागातील ऊग्णांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये येण्यासाठी अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे आरोग्य खात्याने सॅटेलाईट ही नवीन प्रक्रिया सुरू केलेली आहे. या ओपीडी अंतर्गत गोमेकॉचे तज्ञ डॉक्टर ग्रामीण भागातील नजीकच्या इस्पितळात जातात व ऊग्णांची तपासणी करतात, असे मंत्री राणे यांनी सांगितले.
अडवई आरोग्य केंद्रात लवकरच चांगल्या सुविधा
अडवई ग्रामीण आरोग्य केंद्राचे उद्घाटन वर्षभरापूर्वी झाला. या ठिकाणी प्राथमिक गरजा पूर्ण करण्राया सुविधा उपलब्ध आहेत. मात्र या केंद्राचा आगामी काळात दर्जा वाढवून चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यात येतील. या भागामध्ये 108 सुविधा आहे. तसेच शववहिका उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील. गोव्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विविध प्रकारचे रोग आढळून येतात. अशा रोगांचा शोध घेण्याचा प्रयत्न आरोग्य यंत्रणा करणार आहे. वयस्कांसह तरुणांनीही नियमितपणे आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन मंत्री विश्वाजित राणे यांनी केले.
मेडिकल कॅम्पमधील लाभार्थी रुग्णांना गोमेकॉमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. असे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले.यावेळी आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. गीता काकोडकर यांनी याप्रसंगी विचार मांडले.
याप्रसंगी व्यासपीठावर आमदार डॉ. देविया राणे, सरपंच उदयसिंग राणे, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे, उपसरपंच रूपाली गावकर, पंच बाबुराव गावडे, विदेश नाईक, किरण गावडे, मनीषा पिळयेकर, रंजना राणे व इतरांची उपस्थिती होती.
प्रस्ताविक करताना सरपंच उदयसिंग राणे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. वैभव गाडगीळ यांनी केले. आरोग्याधिकारी डॉ. विकास नाईक यांनी आभार मानले.









