रायबाग तालुक्यातील हाळशिरगुर क्रॉसवरील दुर्घटना ः तीन युवकांचा मृत्यू झाल्याने हळहळ
वार्ताहर/ कुडची
बस व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात तिघे युवक ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सदर अपघात रायबाग तालुक्यातील हाळशिरगुर क्रॉसवर शनिवारी सकाळी 9 च्या सुमारास घडला. भगवंत कांबळे (वय 39), विश्वनाथ कांबळे (वय 24), कुमार कांबळे (वय 24 सर्व रा. हाळशिरगुर ता. रायबाग) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, हाळशिरगुर येथून भगवंत कांबळे, विश्वनाथ कांबळे, कुमार कांबळे हे तिघे दररोज मिरज येथे दुचाकीने कामाला जात होते. शनिवारी सकाळी ही ते नेहमीप्रमाणे दुचाकीने कामावर निघाले होते. हाळशिरगुर क्रॉसवरवरुन कुडची-जमखंडी मार्गावरुन जात होते. यावेळी दुचाकी मुख्य रस्त्यावर नेत असतानाच बसची जोराची धडक बसली. यावेळी बस चालकाने उजव्या बाजूला वाहन घेऊन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण कोणाताही उपयोग झाला नाही. दरम्यान बस रस्त्यावरुन खाली कोसळता कोसळता थोडक्यात बचावली. यामुळे बसमधील 39 प्रवाशांना कोणतीही इजा झाली आहे.

या अपघातात दुचाकीवरील भगवंत व विश्वनाथ दोघे जागीच ठार झाले. तर कुमार याला रुग्णालयाकडे उपचारासाठी नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कुडची पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच उपनिरीक्षक माळप्पा पुजारी, निरीक्षक रवी चंद्रप्पा व अथणीचे उपनिरीक्षक श्रीपाद जलदे यांनी घटनास्थळी भेट दिली. कुडची पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली असून पोलीस तपास करीत आहेत.
भगवंत याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, विश्वनाथ याच्या पश्चात पत्नी तर कुमार याच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घरातील कर्ते पुरुष अपघातात गेल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सुदैवाने बसमधील प्रवाशी बचावले
चालकाने दुचाकी आडवी आल्यानंतर बस उजवीकडे घेत दुचाकीस्वारांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला. पण यात त्याला यश आले नाही. मात्र यावेळी बस आणखीन थोडी पुढे गेली असती तर रस्त्याच्या बाजूला असलेल्या 8 फूट खड्डय़ात कोसळली असती. तसेच नजीकच असलेल्या 11 केव्हीच्या विद्युत वाहिनीच्या खांबाला बसची धडक बसून मोठी दुर्घटना झाली असती, पण सुदैवाने मोठी दुर्घटना टळताना 36 प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही.









