अभ्यासाअंती आयसीएमआरचा निष्कर्ष- मल्टीपल व्हेरियंट-डबल म्युटेंट स्ट्रेनवरही परिणामकारक
हैदराबाद / वृत्तसंस्था
‘भारत बायोटेक’निर्मित पूर्णतः स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या तिसऱया टप्प्यातील वैद्यकीय चाचणीच्या निष्कर्षांची घोषणा ‘आयसीएमआर’ने केली आहे. ‘कोव्हॅक्सिन’ लस सौम्य लक्षणे असणाऱया रूग्णांसाठी सरासरी 78 टक्के प्रभावी असल्याचे तपासणीअंती सिद्ध झाले आहे. तसेच प्रकृती चिंताजनक असलेल्या बाधितांसाठी ही लस 100 टक्के प्रभावी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कंपनीने आपल्या दुसऱया विश्लेषणात कोरोनाच्या 87 लक्षणांवर संशोधन करून सदर सुधारित अहवाल बुधवारी केला. या अहवालामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला असून लसीकरणाविषयी असलेली भीती दूर होण्यास यामुळे सहाय्य होणार आहे.
गेल्या दीड-दोन महिन्यांपासून देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच लसीकरणानेही गती पकडली आहे. भारतात जानेवारी महिन्यापासून देशव्यापी लसीकरण हाती घेण्यात आले असून आतापर्यंत 13 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. भारत बायोटेक निर्मित ‘कोव्हॅक्सिन’ आणि सिरम उत्पादित ‘कोव्हिशिल्ड’ या दोन लसी भारतात उपलब्ध आहेत. दोन्ही लसी प्रभावी असल्याचे यापूर्वीच जाहीर केले असले तरी कोरोना विषाणूच्या बदलत्या स्वरुपानुसार वैद्यकीय कंपन्यांकडून वेळोवेळी औषधाची वैधता तपासली जात आहे. त्यानुसार ‘कोव्हॅक्सिन’ ही लस मल्टीपल व्हेरियंट आणि डबल म्युटेंट स्ट्रेनवरही परिणामकारक असल्याचे अभ्यासाअंती दिसून आले आहे. आता लसीच्या मुद्यावर ‘आयसीएमआर’ने प्रभावीपणाबाबत स्पष्ट खुलासा केला आहे. या दाव्यामुळे देशाला कोरोनाच्या संकटात मोठा दिलासा मिळाला आहे.
परिणामकारकतेमुळे दिलासा
‘कोव्हॅक्सिन’ लसीबाबत आयसीएमआरने केलेल्या सविस्तर अभ्यासातून हा तिची परिणामकारकता सिद्ध झाली आहे. आयसीएमआरने यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली. देशात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना सरकारने लसीकरण मोहिमेवर जोर दिला आहे. अशा स्थितीत हा अहवाल सर्वांसाठीच संतोषजनक ठरेल असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे.
पुढील अहवाल जून महिन्यात
कोरोना विषाणू संसर्गाच्या बदलत्या स्थितीनुसार कंपनीने तिसऱया टप्प्यातील चाचणीवेळी 127 लक्षणांचा अभ्यास केला. तिसऱया टप्प्यातील चाचणीत 18 ते 98 वयोगटातील 25 हजार 800 नागरिकांनी लसीच्या चाचणीत सहभाग घेतला. यामध्ये 60 वर्षांवरील अधिक वयाचे 10 टक्के नागरिक सहभागी झाले होते. यात कोरोनावरील ‘कोव्हॅक्सिन’ लस ही 78 टक्के प्रभावी असल्याचे समोर आले. कंपनी आपला पुढील अंतिम अहवाल जून महिन्यात प्रसिद्ध करणार आहे.









