वृत्तसंस्था/ अयोध्या
अयोध्येत रामजन्मभूमीच्या स्थानी भव्य राममंदिराचे निर्माण कार्य वेगाने सुरू असून त्यामुळे अयोध्या हे मोठे पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला येणार आहे. त्यामुळे येथील जमिनींच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. असे असूनही अयोध्या शहरात पाच हेक्टर जमीन (साधारणतः साडेबारा एकर जमीन) मालकाविना असल्याचे आढळले आहे. या बेवारस जमिनींच्या मालकांचा शोध घेण्यासाठी शेकडो वर्षापूर्वीचे कागदपत्र तपासण्यात येत आहेत. ही पाच हेक्टर जमीन शत्रू संपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेली नाही. अयोध्येतील हृदवली भागात रस्त्याजवळ असणारी ही जमीन चार गावांना जोडणारी आहे. तिची अनुमानित किंमत 10 कोटी रुपये आहे. या जमिनीचे नकाशेही नसल्यामुळे तिचे स्वामीत्व कोणाला द्यायचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अयोध्येत सध्या भूमीला इतकी प्रचंड मागणी असतानाही इतकी मोठी जमीन पडून असावी हे आश्चर्यकारक असल्याचे मत नागरिक व सरकारी अधिकारीही व्यक्त करीत आहेत.









