शाळा-रुग्णालयांमधील वावर थांबला ः डॉक्टर-नर्समध्ये भीतीचे वातावरण
अफगाणिस्तानमधील हजारो लोक भीती आणि अराजकतेमुळे तुर्कमेनिस्तान, उज्बेकिस्तान, इराण, ताजिकिस्तान आणि पाकिस्तान समवेत अन्य देशांमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. यातील अनेक जण उपचारासारख्या मूलभूत गरजेसाठी या देशांमध्ये धाव घेत आहेत. तालिबानची राजवट आल्यापासून उत्तर अफगाणिस्तानातील बहुतांश आरोग्य केंद्रे बंद झाली आहेत.
डॉक्टर आणि नर्स भूमिगत झाले आहेत किंवा देश सोडून गेले आहेत. सामान्य लोकांप्रमाणे डॉक्टरही तालिबानला घाबरत आहेत. 90 च्या दशकात सत्तेवर असताना तालिबानने डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱयांचा छळ केला होता, त्याची भीती आजही लोकांच्या मनात घर करून आहे.
आंतरराष्ट्रीय संघटनांसाठी काम करत असलेल्या लोकांचा तालिबानने शोध चालविला आहे. दुसरीकडे मध्यवर्ती व्यवस्था नसल्याने दैनंदिन वापरातील सामग्रीच्या किमती गगनाला भिडू लागल्या आहेत. भीतीमुळे बहुतांश दुकाने बंद आहेत. लोक दुप्पट किंमत देऊन धान्य खरेदी करत आहेत.
हेलमंडमध्ये सर्वाधिक भय
हेलमंड प्रांतात अलिकडच्या काळातील संघर्षात सर्वाधिक बळी गेले आहेत. तेथील विरोधी गट तालिबानशी लढत आहे. येथील हजारोंच्या संख्येत लोकांनी पलायन केले आहेत. या प्रांताच्या हेलमंड, लष्करगाह, गेरश्क आण नादअली जिल्हय़ांमध्ये मुलींच्या शाळा होत्या, पण आता या शाळांच्या इमारती ओस पडल्या आहेत.









