जागतिक सकारात्मक संकेत – सेन्सेक्स 765 अंकांनी तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी जागतिक बाजारातील सकारात्मक संकेताच्या पाठबळावर भारतीय शेअर बाजाराने मोठी उसळी घेत नवा विक्रमी स्तर गाठण्यात यश मिळवलं आहे. बँकिग आणि धातू क्षेत्रातील समभागांनी बाजारात दमदार कामगिरी नोंदवली आहे.
सोमवारी सरतेशेवटी सेन्सेक्स निर्देशांक 765 अंकांच्या वाढीसह 56,889.76 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 225 अंकांच्या वाढीसह 16,931.05 अंकांवर बंद होण्यात यशस्वी झाला आहे. जागतिक सकारात्मक वातावरण, डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत आणि लसीकरणाच्या वेगाचा परिणाम बाजारामध्ये तेजी येण्यामागची कारणे सांगितली जात आहेत. इतर बाजारांमध्ये रोखीचा वापर वाढल्याचा परिणामही शेअर बाजारात दिसला आहे. बाजारात भारती एअरटेलचे समभाग 5 टक्के आणि ऍक्सिस बँकेचे समभाग 4 टक्के तेजीसह बंद झाले. नेस्ले इंडियाचे समभाग मात्र 1 टक्के इतके घसरणीत होते. बाजारात बीएसईवर 3 हजार 497 समभागात व्यवहार झाला असून 2 हजार 215 समभाग तेजीसह तर 1096 समभाग घसरणीसह बंद झाले.
आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअरबाजाराने उत्साही सुरुवात केली. सेन्सेक्स निर्देशांक 56,329 वर तर निफ्टी निर्देशांक 16,775 अंकांवर सकाळी खुला झाला. एकावेळी सेन्सेक्स 550 अंकांच्या तेजीसह 56,670 वर तर निफ्टी 160 अंकांच्या तेजीसह 16865 वर व्यवहार करत होता.
बाजारात मोठय़ा प्रमाणात खरेदी दिसून आली. टाटा स्टील व बजाज फायनान्सचे समभाग 3 टक्के तेजी राखून होते. बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल पहिल्यांदाच 246.51 लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते. ऑटो व मेटल (धातू) क्षेत्रातील समभागांची मोठय़ा प्रमाणात खरेदी होताना दिसली. एनएसईवर धातू निर्देशांक व ऑटो निर्देशांक 1 टक्क्मयाहून अधिक तेजी राखून होते. यापूर्वी शुक्रवारी सेन्सेक्स 176 अंकांच्या वाढीसह 56,124 वर तर निफ्टी 68 अंक वाढून 16,705 अंकांवर बंद झाला होता.
भारतीय शेअरबाजारात विक्रमी तेजी असताना दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपया 31 पैसे मजबूत होताना दिसला. रुपया एक अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 73.98 वर होता.









