तर्क-वितर्कांना उधाण अन् टीका : ए. के. ऍन्टोनी यांच्या हस्ते ध्वजवंदन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेसचा 136 वा स्थापना दिन देशभरात साजरा होत असतानाच काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार असलेले राहुल गांधी हे आदल्या रात्री परदेशात गेल्याने विविध चर्चा आणि तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीमुळे काँग्रेसच्या मुख्यालयात ज्ये÷ नेते ए. के. ऍन्टोनी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
काँग्रेसचा 136 वा वर्धापनदिन सोमवारी देशभर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून साजरा केला जात आहे. मात्र, त्याचवेळी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्याच्या तयारी असलेले राहुल गांधी हे परदेशात पोहोचल्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त ‘देश हित की आवाज उठाने के लिए काँग्रेस सुरू से प्रतिबद्ध रही है। आज काँग्रेस के स्थापना दिवस पर, हम सच्चाई और समानता के अपने उस संकल्प को दोहराते है’ असे ट्विट केले आहे. मात्र, ट्विटरवरुन पक्ष चालविता येत नाही, त्यासाठी लोकांमध्ये जावे लागते, अशी टोलेबाजी राजकीय पातळीवर सुरू झाली आहे. यानंतर आता काँग्रेसच्या नेत्यांकडून टीकेला प्रत्युत्तर दिले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने राहुल गांधी यांनी गेल्या वषी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सोनिया गांधी यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपद सोपविण्यात आले. नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधी यांनी पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे म्हटले होते. राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष करण्याच्या बाजूने बहुतांश नेते असले तरी अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
आजी आजारी असल्याचे निमित्त
राहुल गांधींच्या इटली दौऱयामागचे कारण काँग्रेस नेते राजीव सातव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. राहुल गांधी यांच्या आजींची प्रकृती फार खराब आहे. त्यांना भेटण्यासाठी ते अचानक विदेशात गेल्याचे सातव यांनी स्पष्ट केले आहे.









