सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाची कामगिरी
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात कोरोनावरील लसीची आतुरतेने प्रतीक्षा केली जात आहे. याचदरम्यान न्युमोनियापासून मुलांना वाचविण्यासाठी पहिली ‘मेड इन इंडिया’ लस ‘निमोसिल’ उपलब्ध झाली आहे. ही लस सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने विकसित केली असून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी एका कार्यक्रमादरम्यान त्याचे सादरीकरण केले आहे.
सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनीही ट्विटरवर याची माहिती दिली आहे. न्युमोनिया केविड-19 च्या गंभीर लक्षणांपैकी एक आहे. ही लस मुलांमध्ये न्युमोनिया रोखण्यास महत्त्वाची भूमिका पार पडणार आह. सद्यकाळात कोविड-19 साठी विकसित करण्यात येणारी लस मुलांसाठी नाही. अशा स्थितीत ही स्वदेशी लस मुलांना कोरोनाच्या गंभीर लक्षणांपासून वाचवू शकते असे सीरम इन्स्टिटय़ूटकडून म्हटले गेले आहे.
मोठी कामगिरी
ही लस म्हणजे देशाच्या सार्वजनिक आरोग्यासाठी मोठी कामगिरी आहे. किफायतशीर आणि उच्च गुणवत्तायुक्त ही लस मुलांना न्युमोनियापासून सुरक्षा प्रदान करणार असल्याचे उद्गार हर्षवर्धन यांनी काढले आहेत.
निमोसिल आशेचा नवा किरण
निमोकोक्कल संसर्ग जीवाणूमुळे होते, न्युमोनिया होण्याच्या मोठय़ा कारणांपैकी हे एक आहे. निमोकोक्कल लस मुलांमध्ये गंभीर न्युमोनिया रोखण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार अशी अपेक्षा आहे. तसेही सद्यकाळात कोरोनासाठी विकसित होणाऱया लसी मुलांसाठी नाहीत, अशा स्थितीत निमोसिल लस मुलांसाठी नवी आशा असल्याचे सीरम इन्स्टिटय़ूटचे कार्यकारी संचालक डॉ. राजीव ढेरे यांनी म्हटले आहे.
दीर्घ कालावधीपर्यंत सुरक्षा
सीरम इन्स्टिटय़ूटने ही लस पाथ तसेच बिल अँड मेलिंडा गेट्स फौंडेशनसोबत मिळून विकसित केली आहे. कमी उत्पन्न गटातील देशांमध्ये लस सहजपणे उपलब्ध करण्याच्या दिशेने ही मोठी कामगिरी आहे. नवी लस मुलांना निमोकोक्कल आजारांच्या विरोधात दीर्घकाळापर्यंत प्रभावी सुरक्षा प्रदान करणार आहे.
कमी वयाच्या मुलांना धोका
निमोकोक्कल आजारामुळे जगभरात 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी धोका असतो. 2018 मध्ये निमोकोक्कलमुळे 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 67 हजार 800 मुलांचा मृत्यू ओढवला होता. अशा परिस्थितीत ही लस मुलांना वाचविण्यास उपयुक्त ठरणार असल्याचे पुनावाला यांनी नमूद केले आहे.









