डोनाल्ड ट्रम्प यांनी केली स्वाक्षरी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गांधी-किंग स्कॉलर्ली एक्सचेंज इनिशिएटिव्ह कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. या कायद्याच्या अंतर्गत महात्मा गांधी आणि मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांचे कार्य आणि वारशाचे अध्ययन करण्यासाठी एक शैक्षणिक फोरमच्या स्थापनेचा मार्ग मोकळा होणार आहे. या अधिनियमाचा मसुदा नागरी अधिकार कार्यकर्ते आणि अमेरिकेचे माजी खासदार जॉन लेविस यांनी तयार केला होता.
भारतीय वंशाचे अमेरिकेतील खासदार एमी बेरा यांनी या मसुद्याचे समर्थन केले होते. हा कायदा गांधी-किंग वैचारिक आदान-प्रदान पुढाकारासाठी 2025 या आर्थिक वषापर्यंत दरवर्षी 10 लाख डॉलर्सच्या निधीची तरतूद करणार आहे.
गांधी-किंग जागतिक शैक्षणिक संस्थेसाठी 2021 या आर्थिक वर्षात 20 लाख डॉलर्सची आणि अमेरिका-भारत गांधी-किंग विकास फौंडेशनसाठी 2021 मध्ये 3 कोटी डॉलर्सची तरतूद या कायद्याच्या अंतर्गत होणार आहे.
कायद्याच्या अंतर्गत युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (युएसएड) ला अमेरिका-भारत विकास संघटना स्थापन करण्यासाठी अधिकृत करण्यात आले आहे. भारतात विकास प्राथमिकतांच्या क्षेत्रात खासगी क्षेत्राच्या सहभागासाठी याद्वारे प्रोत्साहन देण्यात येणार आहे.









