वार्ताहर/परळी
ऐतिहासीक वारसा असलेल्या किल्ले सज्जनगडावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराच्या बाजूचा काही भाग गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी ढासळला होता. या बुरुजाच्या संवर्धनाचे काम दुर्गप्रेमीकडून सुरू असून लवकरच हा बुरुज तटबंदी कात टाकून भक्कम होत सज्जनगडाच्या वैभवात भर पाडणार आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी अतिवृष्टीमध्ये किल्ले सज्जनगडचा बुरुजाचा काही भाग ढासळला होता. मात्र हा बुरुज उभारण्यासाठी कोणाकडूनही प्रयत्न न झाल्याने पडलेल्या बुरुजाचा ही काही भाग कोसळत असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. यावर उपाययोजना म्हणून किल्ले सज्जनगड संवर्धन समूहाच्या वतीने बुरुजावर वाढलेली झाडेझुडपे काढून स्वच्छता करून या पडलेल्या बुरुजाचे बांधकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
किल्ले सज्जनगड संवर्धनासाठी सर्वतोपरी सहकार्य
किल्ले सज्जनगडावर संवर्धनाचे जे कार्य सुरू आहे, त्यासाठी रामदास स्वामी संस्थांच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. दुर्गनाथ प्रतिष्ठान या दुर्गप्रेमी समूहाला जी मदत लागेल ती मदत करणार तसेच गडावरील बुरूज उभारणी, रामगुहा मार्ग मोकळा करणे, धाब्याचा मारुती मंदिर, अंगलाई देवी मंदिर परिसरात वनराई करणे, मशाल उत्सव स्वच्छता मोहीम यासाठी संस्थेचे सहकार्य राहणार असल्याचे रामदास स्वामी संस्थानचे विश्वस्त सु. ग. स्वामी यांनी सांगितले.









