नवी दिल्ली
भारताचा बॅडमिंटनपटू 34 वर्षीय अजय जयरामने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन क्षेत्रातून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. गेल्या जवळपास दोन दशकाच्या कालावधीत अजय जयरामने आपल्या व्यावसायिक बॅडमिंटन क्षेत्रामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले.
पुरूष बॅडमिंटनपटूंच्या मानांकन यादीत अजय जयरामने 13 वे स्थान मिळविले होते. त्याने आपल्या बॅडमिंटन कारकीर्दीत दोनवेळा हॉलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद तर 2015 साली कोरिया खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. अजय जयरामने सोशल मिडियावर आपल्या निवृत्तीची घोषणा केली. लंडन ऑलिंपिकसाठी पात्रता स्पर्धेत जयराम आघाडीवर होता पण भारताच्या पी.काश्यपने त्याला मागे टाकले होते. अलिकडच्या कालावधीत वारंवार दुखापतीमुळे जयरामला बॅडमिंटनपासून अलिप्त राहावे लागले होते. 2016 च्या आशियाई सांघिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱया भारतीय पुरूष संघामध्ये अजय जयरामचा समावेश होता. अजय जयरामर्ने गेल्या जानेवारीत ओडिशा खुल्या सुपर 100 मध्ये आपली शेवटची स्पधा खेळली होती.









