मडगाव
सातव्या हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत काल बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात मुंबई सिटी एफसीने आपल्या सलग तिसऱया विजयाची नोंद करताना ओडिशा एफसीला 2-0 गोलांनी पराभूत केले. विजयाच्या 3 गुणांनी आता मुंबई सिटीचा संघ 9 गुणांनी आघाडीवर आहे. त्यांच्या बार्थोलोम्यू ओगबेचे आणि रॉवलीन बॉर्जिस यांनी गोल नोंदविले. हे दोन्ही गोल सामन्याच्या पहिल्या सत्रात झाले.
मुंबई सिटीने आता आघाडीवरील एटीके मोहन बागानला गुणांवर गाठले व सरस गोलसरासरीवर त्यांना मागे टाकले. एटीकेचा गोलफरक 4 (4-0) तर मुंबई सिटीचा 5 (6-1) असा राहिला. एटीकेचा एक सामना कमी झाला असून त्यांच्याविरूद्ध अद्याप एकही गोल झालेला नाही. मुख्य म्हणजे एटीके अजुनही अपराजित आहे.
ओडिशाचा शुभम सारंगी याच्या ढिलाईमुळे मुंबई सिटीला पॅनल्टी मिळाली. 29व्या मिनिटाला मुंबईचा मीडफिल्डर विघ्नेश दक्षिणामूर्ती याचा क्रॉस शॉट अडविण्याच्या प्रयत्नात चेंडू त्याच्या हाताला लागला. त्यामुळे रेफ्री रणजीत बक्षी यांनी मुंबई सिटीला दिलेल्या पॅनल्टीवर ओगबेचेने गोलरक्षक कमलजीतसिंग भेदले व संघाला आघाडीवर नेले.
पहिल्या सत्रातील अखेरच्या मिनिटाला मध्यरक्षक रॉवलीन बॉर्जिसने डावीकडून आगेकूच करीत गोलक्षेत्रात प्रवेश केला. त्याने बिपीनला पास दिल्यानंतर परत एकदा बिपीनने दिलेल्या पासवर चेंडूचा योग्य अंदाज घेत आणि शारीरिक संतुलन साधत बॉर्जिसने मुंबईचा दुसरा गोल केला. पहिल्या सत्रात त्यापूर्वी मुर्ताडा फॉलने हेडरवर केलेला गोल रेफ्रीने अवैद्य ठरविला होता. दुसऱया सत्रात मुंबई सिटीने काही उल्लेखनीय प्रयत्न केले. प्रथम 59व्या मिनिटाला हय़ुगो बूमसचा गोल करण्याचा प्रयत्न थोडक्यात हुकला. ओडिशाने 67व्या मिनिटाला प्रयत्न केला. यावेळी बदली खेळाडू मार्सेलिनो परेराने घेतलेली फ्रिकीक अडविली गेली. आलेल्या रिबाऊंडरवर डायगो मारिसियोने मारलेला फटका मुंबई सिटी एफसीचा गोलरक्षक अमरींदर सिंगने अडविला.









