मडगाव
सातव्या हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत आज सोमवारी वास्कोतील टिळक मैदानावर एटीके मोहन बागानचा सामना जमशेदपूर एफसीविरूद्ध होणार आहे. सलग चौथ्या विजयापासून एटीकेला रोखण्याचा जमशेदपूरचा निर्धार असेल. सध्या 3 सामन्यांतून 9 गुणांनी एटीके पहिल्या स्थानावर आहेत तर जमशेदपूरचे 3 सामन्यांतून फक्त 2 गुण झाले आहेत.
आक्रमणासह बचावातही एटीके मोहन बागानची कामगिरी बहरली आहे. त्यांच्याविरूद्ध अद्याप एकही गोल झालेला नाही. याशिवाय त्यांच्याविरूद्ध नेटच्या दिशेने गोलसाठी केवळ चार शॉट्सची नोंद झाली आहे. दुसरीकडे जमशेदपूरची सुरूवात फारशी आनंददायक ठरलेली नाही. तीन सामन्यांत दोन बरोबरी आणि एक पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. यानंतरही प्रशिक्षक ओवेन कॉयल यांना बलाढय़ प्रतिस्पर्ध्याला गारद करण्याचा विश्वास वाटतो.
प्रत्येक सामना हे एक आव्हान असते. प्रत्येक सामना चुरशीचा असल्याचे या लीगने दाखवून दिले आहे असे कॉयल म्हणाले. गुणांच्या बाबतीत एटीके मोहन बागानने चांगली सुरूवात केली असून उत्तम निकाल साध्य केले आहेत. आम्ही कोणत्याही संघाविरूद्ध तोडीस तोड खेळ करू शकतो हे आम्ही अलिकडच्या कामगिरीवरून दाखवून दिले आहे, असे कॉयल म्हणाले. बरोबरीचे विजयात रूपांतर करणे आम्हाला गरजेचे आहे आणि त्या तीन गुणांमुळे गुणतक्त्यात स्वाभाविकच आमची आगेकूच होईल असे ते म्हणाले.
एटीकेचे प्रशिक्षक आंतोनियो हबास यांना चांगल्या प्रारंभामध्ये आक्रमणाबरोबरच बचावाचाही महत्वाचा वाटा असल्याचे वाटते. तीन सामन्यांत क्लीन शीट राखत स्पर्धेची सुरूवात करणे महत्वाचे आहे. आमच्या संघाला आत्मविश्वास लाभला असून प्रगती साध्य झाली आहे. डावपेचांच्या पातळीवर अधिकाधिक शिस्त आणि प्रयत्न हेच चांगल्या कामगिरीचे गुपित असल्याचे आंतोनिया हबास म्हणाले. माझ्या संघाला अजूनही सुधारणा करण्याची गरज असल्याच्या काही बाबी स्पेनच्या हबास यांनी हेरल्या आहेत. आम्हाला आमच्या मीडफिल्डमध्ये सुधारणा करावी लागेल. जमशेपूरचा संघ अवघड प्रतिस्पर्धी असेल. त्यांच्या संघात चांगले खेळाडू आहेत, असे हबास म्हणाले.









