केरळ ब्लास्टर्स 3-1 गोलांनी पराभूत
मडगाव
एफसी गोवाने यंदाच्या आयएसएल फुटबॉल स्पर्धेत आपल्या पहिल्या विजयाची नोंद करताना केरळ ब्लास्टर्सला 3-1 गोलांनी पराभूत केले. फातोर्डा स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात मध्यंतराला एफसी गोवाचा संघ एक गोलने आघाडीवर होता.
एफसी गोवासाठी इगोर अँगुलोने दोन तर जॉर्ज ऑर्तिज मेंडोझाने एक गोल केला. पराभूत केरळ ब्लास्टर्सचा एकमेव गोल विसेंत गोमीझने केला. या विजयाने एफसी गोवाला 3 गुण मिळाले. त्यांचे आता 4 सामन्यांतून 5 तर केरळ ब्लास्टर्सचे तेवढय़ाच सामन्यांतून फक्त 2 गुण झाले आहेत. गुणतक्त्यात आता एफसी गोवा चौथ्या तर केरळ ब्लास्टर्स नवव्या स्थानावर आहेत.
सामन्याच्या पहिल्या 20 मिनिटात एफसी गोवाचे दोन वेळा गोल करण्याचे प्रयत्न गोल खांब्याला आदळून परत आले. सामन्याच्या सातव्या मिनिटाला केरळ ब्लास्टर्सने सामन्यातील पहिली धोकादायक चाल केली. मात्र त्यांच्या के. पी. राहुलचा गोल करण्याचा यत्न एफसी गोवाच्या बचावफळीने उधळून लावला.
त्यानंतर दहाव्या मिनिटाला जॉर्ज ऑर्तिझ मेंडोझाने निशूकुमारला चकवित हाणलेला वेगवान शॉट क्रॉसबारला लागून परत खेळात आला. लगेच त्याचाच एक गोलमध्ये जाणारा फटका केरळ ब्लास्टर्सच्या एका डिफेंडरने ब्लॉक केला. पहिल्या सत्रातील एफसी गोवाची सामन्यातील सर्वांत सोपी संधी 17व्या मिनिटाला वाया गेली. यावेळी बचावपटू रोहितकुमारच्या चुकीचा फायदा घेत इगोर अँगुलोने गोलरक्षक आल्बिनो गोम्सलाही चकविले होते, मात्र त्याचा फटका गोलच्या पट्टीला लागून परत आला.
29व्या मिनिटाला एफसी गोवाच्या प्रयत्नाना यश आले. सॅवियर गामाने केरळ ब्लास्टर्सच्या डाव्या बगलेतून दिलेल्या पासवर इगोर अँगुलोने बचावासाठी पुढे आलेला गोलरक्षक आल्बिनो गोम्सच्या डोक्यावरून चेंडूला गोलमध्ये टाकले आणि आघाडी घेतली. एफसी गोवाचे गोलमशीन असे संबोधल्या जाणाऱया इगोरचा हा आयएसएलमधील चौथा गोल ठरला.
दुसऱया सत्रातील खेळावरही एफसी गोवाचे वर्चस्व राहिले. मैदानाच्या दोन्ही बगलेतून एफसी गोवाच्या चांगल्या चाली रचल्या. 52व्या मिनिटाला एफसी गोवाने आपली आघाडी वाढविली. प्लेमेकर ब्रँडन फर्नांडिसने दिलेल्या थ्रू-पासचे सोनं करताना जॉर्ज मेंडोजाने आल्बिनो गोम्सच्या उजव्या बाजूने चेंडू जाळीत टोलविला.
सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला केरळ ब्लास्टर्सने गोल करून पिछाडी एक गोलने कमी केली. निशूकुमारने उजव्या बगलेतून केलेल्या क्रॉसवर विसेंत गोमीझने एका जबरदस्त हेडरवर एफसी गोवाचा गोरलक्षक मोहम्मद नवाजला काहीच करण्याची संधी दिली नाही.
त्यानंतर लगेच केरळ ब्लास्टर्सचा कप्तान कॉस्ताला सामन्यात दुसरे इलो कार्ड पडल्याने त्याला रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर घालविण्यात आले. एफसी गोवाने इंज्युरी वेळेत आपला तिसरा गोल केला. आल्बिनो गोम्सच्या चुकीचा फायदा घेत इगोर अँगुलोने सामन्यातील आपला दुसरा आणि संघाचा तिसरा गोल केला. अँगुलोने आतापर्यंत चार सामन्यांतून पाच गोल केले आहेत.









