प्रतिनिधी/मुंबई
खंडणीच्या विविध पाच प्रकरणात पोलीसांना सापडत नसलेले माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना अखेर फरार घोषीत करण्यात आले. मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या अर्जाची गंभीर दखल घेत मुख्य अतिरिक्त महानगर दंडाधिकारी भाजीपाले यांनी मंगळवारी अखेर सिंग यांच्यासह रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू यांना गोरेगाव खंडणी प्रकरणी फरार घोषीत केले.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात पाच खंडणीचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गोरगांव येथील खंडणी प्रकरणाचा तपास करणाऱया गुन्हे अन्वेषण विभागाने सिंग यांना चौकशीसाठी समन्स बजावले. मात्र सिंह हजर न राहिल्याने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आले. खंडणीच्या गुह्यात आत्तापर्यंत केलेल्या तपासानुसार आरोपी असलेले माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे सापडत नसल्याने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्यावतीने विशेष सरकारी वकील ऍड. शेखर जगताप यांनी मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू यांना फरार घोषीत करण्यात यावे असा विनंती करणारा अर्ज सादर केला होता. त्या अर्जावर मुख्य अतिरिक्त दंडाधिकारी भाजीपाले यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी ऍड. शेखर जगताप यांनी या आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 384, 385, 388, 389, 120-ब व 34 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंटही जारी केले. ते बजावण्याचे अधिकाऱयांनी प्रयत्न केला.
तिन्ही आरोपींना त्यांच्या पत्त्यावर शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे आढळले नाहीत. परमबीर यांच्या मुंबईतील मलबार हिल येथील घरातील त्यांचा सुरक्षारक्षक सतीश बुरुटे व खानसामा रामबहादूर थापा यांनी परमबीर व त्यांचे कुटुंब मागील तीन महिन्यांपासून या ठिकाणी राहत नसल्याचे सांगितले. त्यामुळे हे तिघेही फरार झाल्याचे निष्पन्न होत असल्याने त्यांना फरार घोषित करण्यासाठी फौजदारी दंड संहितेच्या कलम 82 व 83 अंतर्गत कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी आणि फरार घोषीत करावे अशी विनंती केली. याची दखल घेत मुख्य अतिरिक्त महानगर दंडाधिकारी भाजीपाले यांनी फरार घोषीत करण्याचा आदेश दिला.








