प्रतिनिधी /पणजी

गोव्यात दि. 20 ते 28 रोजी दरम्यान साजरा होणाऱया 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभरातील समकालीन चित्रपटसृष्टीतील काही दिग्गजांचे चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या विभागात प्रँकोझस ओझोन दिग्दर्शित ‘एवरीथिंग वेन्ट फाईन’, होंग सांगसो दिग्दर्शित ‘इन प्रंट ऑफ युअर फेस, अपिचटपोंग वीरासेथाकुल दिग्दर्शित ‘मेमोरिया’, पेद्रो अल्मोदोवर दिग्दर्शित ‘पॅरेलल मदर्स’, बेनायट जेकॉट दिग्दर्शित ‘सुझाना ऍन्डलेर’, टोनी गटलिफ दिग्दर्शित टोम मेडिना या चित्रपटांचा समावेश आहे.
याशिवाय रेट्रोस्पेक्टीव्ह विभागात प्रसिद्ध हंगेरियन फिल्ममेकर बेला टार, आणि रशियन फिल्ममेकर आंद्रेई कोन्चालोव्स्की यांचे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. बेला टार यांच्या चित्रपटांचे बर्लिन, कान्स आणि लोकार्नो चित्रपट महोत्सवात कौतुक करण्यात आले आहे. आंचिममध्ये आंद्रेई कोन्चालोव्सकी यांचे ‘द फर्स्ट टीचर’, ‘अंकल वान्या,’ ‘रनवे ट्रेन’, ‘द पोस्टमॅन व्हाईट नाईट्स’, ‘पॅराडाईज’ हे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. तसेच बेला टार यांचे ‘फॅमिली नेस्ट’, ‘आऊटसाईडर’, ‘डॅम्नेशन’, ‘द टूरिन होर्स,’ हे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. आंचिमच्या प्रत्येक आवृत्तीत चित्रपटसृष्टीने गमावलेल्या दिग्गजांना श्रद्धांजली वाहिली जाते. यंदाही आंचिमच्या होमेज विभागात बर्ट्रांड टॅव्हर्नियर, क्रिस्टोफर प्लमर, जीनक्लॉड कॅरियर आणि जीनपॉल बेलमोंडो यांना चित्रपटांद्वारे श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. या विभागात बर्ट्रांड टॅव्हर्नियर यांचे ‘अ संडे’, क्रिस्टोफर प्लमर यांचा ‘ऑल द मनी इन द वर्ल्ड, जीनक्लॉड कॅरियर यांचा ऍट इटर्निटीझ गेट, आणि जीनपॉल बेलमोंडो यांचा ‘ब्रेथलेस’ हे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.









