सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात वातावरण असतानाही राणेंच्या नेतृत्वाखाली बँकेने निवडणूक जिंकली. मात्र शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तीनही पक्ष एकत्रित येऊनही सत्ता मिळवता आली नाही. त्यामुळे जिल्हा बँकेचा निवडणूक निकाल म्हणजे महाविकास आघाडीला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल आहे.
सहकारातील निवडणुका आणि सार्वत्रिक निवडणुका वेगवेगळय़ा असतात, असे म्हटले जाते. परंतु, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रचंड राजकीय रंग चढला होता आणि नारायण राणेंच्या राजकीय शक्तीचाच विजय झाला. सलग तिसऱयांदा राणेंच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्याच्या समर्थकांनी सत्ता काबीज केली. त्यानिमित्ताने भाजपला कधी नव्हे ते बँकेवर झेंडा फडकवण्याचे स्वप्न पूर्ण करता आले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देत भाजपने बाजी मारल्याने आत्मविश्वास वाढलेल्या भाजपाला आगामी जिल्हा परिषद, नगरपरिषद निवडणुकीतही भाजपला सत्तेची स्वप्ने पडू लागली आहेत. स्थिती अशीच राहिली, तर सत्तेची स्वप्ने पूर्ण करता येणे शक्मयसुद्धा आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची स्थापना 1983 मध्ये झाली आणि बँकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच जिल्हा बँक राहिली होती. यावेळी पहिल्यांदाच भाजपच्या ताब्यात बँक गेली. भाई सावंत, केशवराव राणे, डी. बी. ढोलम, शिवराम भाऊ जाधव यांनी शेतकऱयांचा विश्वास संपादन करीत जिल्हा बँक भक्कम केली. त्यानंतर 2008 मध्ये नारायण राणे यांनी शिवराम जाधव यांच्या वर्चस्वाला धक्का देत जिल्हा बँक ताब्यात घेतली. त्यावेळी राणे शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये आले होते. त्यामुळे राणेंच्याच नेतृत्वाखाली काँग्रेसने निवडणूक जिंकली. त्यानंतर 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीतही राणेंच्याच नेतृत्वाखाली जिल्हा बँक निवडणूक जिंकली. त्यानंतर 2018 च्या दरम्यान राणेंनी काँग्रेस पक्ष सोडत काही काळासाठी स्वाभिमान पक्ष स्थापन करून नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र जिल्हा बँकेवर त्यांनी बसविलेले चेअरमन सतीश सावंत यांनी राणेंशी फारकत घेत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे दोन वर्षांसाठी जिल्हा बँक शिवसेनेच्या ताब्यात गेली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेत असताना त्यांना जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळवता आले नव्हते. मात्र त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर पहिल्यांदा काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हा बँक काबीज केली. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सहकार महषी शिवराम भाऊ जाधव यांच्या ताब्यात बँक होती. त्यांनीच या बँकेचा पाया भक्कम केला. त्यानंतर झालेल्या दुसऱया सार्वत्रिक निवडणुकीतही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पुन्हा सत्ता काबीज केली होती. यावेळी राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता होती. मात्र त्यावेळी भाजपचे एकमेव संचालक म्हणून निवडून गेले होते. यापूर्वी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या साथीने बाजी मारली होती. त्यामुळे जिल्हा बँकेत राज्यातील युती सरकार किमया करेल असे वाटत होते, पण एका जागेवर समाधान मानावे लागले होते.
या निवडणुकीत मात्र चित्र वेगळे होते. शिवसेना-भाजप एकत्र नव्हते, तर भाजप एकटी लढत होती आणि राज्याच्या महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तिन्ही पक्ष एकत्र येत महाविकास आघाडीमार्फत निवडणूक लढवली. मागील निवडणुकीत एकत्रित निवडणुका लढल्या. त्याप्रमाणे या निवडणुकीतही काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र होते. परंतु त्यात केंद्रीय मंत्री राणे यांची राजकीय शक्ती नव्हती. मात्र गेली साडेसहा वर्षे एकहाती जिल्हा बँक सांभाळणाऱया सतीश सावंत यांचा अनुभव, अभ्यास होता. शिवसेनेची अतिरिक्त ताकद होती. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार, हे निश्चित होते. त्यातच गेली दोन वर्षे दोन्ही बाजूने निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू होती. त्यामुळे या निवडणुकीत ‘काँटे की टक्कर’ होणार हे ठरलेले होते. त्यामुळे महाविकास आघाडी व भाजपने ही निवडणूक प्रति÷sची केली आणि राज्यभर गाजली सुद्धा.
मागील साडेसहा वर्षात उत्तमप्रकारे जिल्हा बँकेचा कारभार संभाळून जिल्हा बँकेचे नाव राज्यात उज्वल केले. या जोरावरच सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने जिल्हा बँकेची निवडणूक लढवली. या निवडणूक प्रचारासाठी शिवसेना आमदार, खासदार, पालकमंत्री उदय सामंत, काँग्रेसचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील प्रचारासाठी आले. एवढेच नव्हे, तर सहकारातील दांडगा अनुभव असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही आणले गेले. सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निवडणुकीत मुद्दा पुढे आला. एवढी सगळी पोषक परिस्थिती असतानाही भाजपने महाविकास आघाडीला धक्का देत जिल्हा बँकेची सत्ता काबीज केली.
भाजपनेही जिल्हा बँक निवडणूक प्रति÷sची केली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे जिल्हय़ात ठाण मांडून होते. माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हेही जास्त गाजावाजा न करता कार्यकर्त्यांना रसद पुरवत होते. त्यामुळे तिन्ही पक्षांनी ताकद लावून सुद्धा अनपेक्षितपणे महाविकास आघाडीला धक्का देत जिल्हा बँकेतील संचालक मंडळाच्या 19 जागांपैकी 11 जागा भाजपने जिंकल्या. तर महाविकास आघाडीने आठ जागा जिंकल्या. त्यात शिवसेना तीन, काँग्रेस तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा जिंकता आल्या. या नवीन संचालक मंडळामध्ये नव्या चेहऱयांना आणि तरुणांना संधी मिळाली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचा कारभार चांगला करून जिल्हा बँकेचे नाव राज्यात कायम अग्रेसर ठेवावे, हीच अपेक्षा आहे.
नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेवर सत्ता येण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. त्यानिमित्ताने मात्र भाजपला जिल्हा बँकेवर सत्ता मिळविण्याचे स्वप्न पूर्ण करता आले, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे सत्ता मिळविण्याचे स्वप्न भंगले. या निवडणुकीत शिवसेनेपेक्षा खरा धक्का काँग्रेस व राष्ट्रवादीला बसला आहे. कारण अनेक वर्षे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेच जिल्हा बँकेवर वर्चस्व होते. ते वर्चस्व या निवडणुकीत मोडीत निघाले. दोन्ही पक्षांच्या जागाही घटल्या आहेत. महाविकासमधील शिवसेनेला कधी आजपर्यंत जिल्हा बँकेवर सत्ता मिळवता आली नाही. या निवडणुकीत मोठे यश मिळवता आले नाही, तरी शिवसेनेचे फार मोठे नुकसान झालेले नाही.
संदीप गावडे








