मॅडम आत येऊ? हो..या..बसा ना.. बसताक्षणी त्या दोघांनीही एकमेकांकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि पवनने वरच्या पट्टीतच सुरुवात केली. प्रिया तू, तू त्याला जास्त लाडावून ठेवले आहेस म्हणून ही वेळ आली. फाजील लाड करायचेच नाहीत मुलांचे..
अरे व्वा!! सगळं माझ्यावर ढकलून दे. तू वाटेल तशी खेळणी आणून देतोस तेव्हा.. एक तरी खेळणं धड आहे का घरात. सगळय़ांची नुसती मोडतोड. सगळे मलाच दोष देतात. मी सांगते का त्याला असं वागायला. सगळय़ांचं सगळं बरं चाललंय. मला मात्र कुठे जायचीही चोरी झालेय. अशापेक्षा मूल नसलेलं बरं..
अरे…हो हो हो…काय चाललंय तुमचं? तुम्ही नीट सांगितलं तर मला कळेल ना?
मॅडम..सॉरी. असं म्हणतच ती हुंदके देऊन रडू लागली. मॅडम असह्य झालंय हो. काही सुचत नाही. आता आमच्यातच भांडणं होऊ लागली आहेत. या आधी असं नव्हतं. मिहीर झाला आणि चित्रच बदललंय.. तिचं शेवटचं वाक्मय पूर्ण होतंय न होतंय तोच धाडकन् दार उघडून मिहीर आत घुसला.. त्याला सांभाळणारी मुलगी धडपडतच आत आली. त्याने माझ्या टेबलवरच्या एक दोन वस्तू फटाफट उचलल्या आणि खाली टाकल्या.
टेबलवरचे स्टॉप वॉच हाताने गरागर उलटे सुलटे फिरवू लागला. मी पटकन् तिथले पेपरवेट उचलले आणि ड्रॉवरमधे ठेवले. टेबलवरच्या बाकी वस्तू उचलेपर्यंत मिहीरने हातात पेन घेऊन त्याचे दोन तुकडेही केले. त्याची आई त्याला ओरडली तसा तो खुर्चीतून उतरला आणि धावू लागला. त्या मुलीने, ‘मिहीर आपण बाहेर जाऊया आणि बसून व्हीडिओ गेम खेळूया’ असे म्हणत कसंबसं त्याला बाहेर नेलं. तेव्हा कुठे थोडा वेळ तो बाहेर थांबला.
पाच सात मिनिटेच तो आतमध्ये होता परंतु तो काळ कमालीचा दमवणारा होता. खरंच याला सांभाळणे ही कसोटीच होती. मुलाच्या या अवस्थेबद्दल ते दोघेही एकमेकांना दोष देत होते. त्यांच्यातील वाद एवढे वाढले होते की नात्याचा प्रवास ते तुटण्याच्या दिशेकडे वळला होता. हे असं का होत आहे या प्रश्नासोबतच त्यांच्यातली वाढलेली भांडणे आणि तणाव ही समस्या घेऊन खरंतर ते माझ्याकडे आले होते.
मिहीरची ही अवस्था तुमच्यापैकी कुणा एकाच्या लाडामुळे नव्हे तर ती अवस्था म्हणजे त्याच्या मानसिक अव्यवस्थेची लक्षणे आहेत हे त्यांना समजावून सांगितले.
मिहीरच्या शाळेबाबत विचारणा केली असता. आई वडिल दोघांनीही येणाऱया तक्रारींनी आम्ही थकलो आहोत हे सांगत मिहीर कसा खोडय़ा करतो, हातातली एखादी वस्तू कशी झटकन् फेकून मारतो, असंबद्ध बडबड अशा अनेक गोष्टी सांगितल्या. तो ज्यावेळी झोपेल त्यावेळी आणि तेवढीच स्वस्थता असते मॅडम! असं सांगत त्याची आई पुन्हा रडू लागली.
मला ADHD चे प्रतिनिधित्व करणारी ही केस वाटली. ADHD चे विस्तारित रूप Attention Deficit Hyperactivity Disorder असे आहे. याचे निदान करणे तसे थोडे क्लिष्टच असते. कधी कधी फसव्या लक्षणांमुळेही गोंधळ होऊ शकतो. यासाठी रुग्णात दिसून येणारी काही विशिष्ट लक्षणे आणि कालावधी हे निकष महत्त्वाचे ठरतात. इतर अनेक गोष्टीही विचारात घ्याव्या लागतात. या केसमध्ये या विकाराविषयी पालकांना माहिती देणे गरजेचे होते. मुलाला औषधोपचार करणे गरजेचे होतेच. त्यासाठी त्यातील तज्ञ व्यक्तीचे सहाय्य घेणे आवश्यक असल्याचेही त्यांना सांगितले. शिवाय मानसोपचार तंत्राच्या सहाय्याने काय करता येणे शक्मय आहे याची सविस्तर माहिती दिली. तसेच या विकारामुळे उद्भवू शकणाऱया वर्तन समस्यांबद्दल, अभ्यासात येणाऱया संभाव्य अडचणीबद्दलही कल्पना दिली.
अलीकडच्या काळात अस्थिर आणि चंचल मुलांच्या समस्या वाढत आहेत. साधारपणे वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षांपर्यंत सगळीच मुले थोडीफार चंचल, धावणारी, धडपडणारी असतात. वय वाढते तसे हे वागणे आपोआप कमी होते. काहींच्याबाबतीत मात्र ते कमी न होता वाढते आणि घरच्यांसाठी, शाळेसाठी त्रासदायक आणि आव्हानात्मक ठरते. मुलांची ही अशी वर्तणूक त्यांच्या आजाराचा भाग असू शकते याची अनेकांना कल्पनासुद्धा नसते. ADHD शी मिळताजुळता विकार ADD (Attention Deficit Disorder) या विकाराने त्रस्त असलेल्या मुलांमध्ये अतिचंचलता तेवढी आढळत नाही. बाकी सगळी लक्षणे ADHD प्रमाणेच असतात. पूर्वी हे दोन विकार भिन्न असल्याचे मानले जाई परंतु आता या दोन्हीचा विचार ADHD या एकाच संज्ञेअंतर्गत होतो. तरी उपचार मात्र लक्षणांनुसारच ठरवावे लागतात.
ADHD या विकाराची महत्त्वाची लक्षणे तीन गटात विभागता येतात.
1. चित्ताच्या एकाग्रतेचा अभाव (Inattention)
2.अतिचंचलता व अस्थिरता (Hyperactivity)
3. भावनावशता (Impulsivity) म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन परिणामांचा विचार न करता वागणे.. थोडक्मयात लहरीपणा. बहुतांश या विकाराने ग्रस्त मुलांमध्ये वरील तीनही लक्षणे पहायला मिळतात.
1. एकाग्रता व अवधानाचा अभाव- या विकाराने ग्रस्त मुले एकाच गोष्टीवर फार काळ चित्त एकवटू शकत नाहीत. हाती असलेल्या गोष्टीतील नावीन्य क्षणार्धात संपून पुन्ही ती नव्या गोष्टीकडे वळतात. यामुळे कोणत्याही गोष्टीतले बारकावे त्यांच्या नजरेच्या टप्प्यात येत नाहीत. नवीन गोष्ट शिकणे अवघड होऊन बसते. लेखन वाचन याची तीव्र नावड दिसते कारण तिथे नजर आणि चित्त एकाग्र करावे लागते. तिथे गडबड होते.
2. अतिचंचलता व अस्थिरता-यामुळे ही मुले सतत इकडून तिकडे धावणे, धडपडणे, सतत वळवळ करणे, हातापायाचे चाळे, कशालाही धडकणे, अखंड बडबड अशा गोष्टी करताना दिसतात. आवाक्मयात असलेल्या कोणत्याही गोष्टीजवळ ते खेळतात. त्यातील संभाव्य धोके त्यांच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे भाजणे, कापणे, पटकन् शॉक लागणे या गोष्टी होऊ नयेत म्हणून पालकांना फार जागरुक रहावे लागते. शांतपणा हा शब्दच पालकांना या मुलांच्याबाबतीत स्वप्नवत वाटावा अशी काहीशी स्थिती असते.
3.भावनावशता- ADHD ग्रस्त मुले जे मनात येईल तसे वागताना दिसतात. एखाद्या गोष्टीचा सारासार विचार, त्या गोष्टींचे मूल्यमापन करणे, उपलब्ध पर्यायांचा विचार करणे या गोष्टी या मुलांना जमत नसल्याने ही मुले अधिरपणे, अविचाराने वागताना दिसतात. झटकन् भावनांचे प्रकटीकरण, कुठल्याही गोष्टीची वाट न पाहणे या गोष्टी या विकारग्रस्त मुलांमधे पहायला मिळतात. अर्थात या वर्तन समस्येविषयी एकाच लेखामध्ये सर्व मांडणे शक्मय नाही. या विषयी अधिक जाणून घेऊया पुढच्या भागात..
– ऍड.सुमेधा देसाई








