केंद्रीयमंत्री नितीश गडकरींचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रस्ते परिवहन तसेच महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी सोमवारी रस्ते सुरक्षा महिन्याचा शुभारंभ करत सुरक्षेबद्दल सरकारची प्रतिबद्धता अधोरेखित केली आहे. आतापर्यंत आम्ही राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह पाहत आलो आहोत, परंतु आजपासून आम्ही राष्ट्रीय रस्तेसुरक्षा महिन्याचे पालन करू. रस्तेदुर्घटनांममध्ये 70 टक्के मृत्यू हे 18-45 वयोगटातील लोकांचे होतात. भारतात रस्ते दुर्घटनांमुळे प्रतिदिन 415 जण मृत्युमुखी पडत असून हे जीव वाचविण्याची गरज असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे.
भारत सरकारने मागील वर्षी स्वीडनमधील एका संमेलनात भाग घेतला होता. या संमेलनात भारतात शून्य रस्ते दुर्घटनांसंबंधी एक संकल्पबद्ध निर्णय घेण्यात आला होता. घातक प्रकरणांना 50 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे आश्वासन आम्ही दिले होते. तामिळनाडूने 53 टक्के यशाच्या दरासह हे करून दाखविले आहे. 2030 पर्यंत आम्ही प्रतीक्षा करत राहिल्यास 6-7 लाख लोक आणखीन मृत्युमुखी पडतील. याचमुळे 2025 पूर्वी रस्ते दुर्घटना आणि यातील बळींमध्ये 50 टक्क्यांची घट आणण्यासाठी काम करण्यात येणार असल्याचे गडकरी म्हणाले.
रस्तेसुरक्षेविषयी जागरुकता फैलावण्यासाठी सरकारी विभाग, स्वयंसेवी संस्था आणि अन्य संघटनांना सहकार्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सरकारने प्रतिदिन 30 किलोमीटर लांबीचे रस्ते निर्माण करण्याचे लक्ष्य गाठले आहे. मार्चच्या अखेरपर्यंत आम्ही प्रतिदिन 40 किलोमीटर लांबीचा रस्ता निर्माण करण्याचे लक्ष्य प्राप्त करू असे उद्गार त्यांनी काढले आहेत.









