पाहताक्षणीच अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रेमात, 4 वर्षे तुरुंगात राहून कारकीर्द बुडविली
बॉलिवूड अभिनेत्री मोनिका बेदी 46 वर्षांची झाली आहे. 18 जानेवरी 1975 रोजी पंजाबच्या होशियारपूरमध्ये जन्मलेल्या मोनिकाच्या लहानपणीच तिचे आईवडिल नॉर्वेत स्थलांतरित झाले होते. भारतात काही वर्षे शिक्षण घेतल्यावर साहित्याच्या अभ्यासकरता तिने ऑक्सफोर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला होता. शिक्षण सुरू असतानाच अभिनयाची आवड निर्माण झाल्याने मोनिकाने 1995 मध्ये दिल्लीत याचे धडे गिरविण्यास प्रारंभ केला होता.
तेलगू चित्रपटातून पदार्पण
शिक्षण सुरू असतानाच मोनिकाला ताज महल या तेलगू चित्रपटातून पदार्पण करण्याची संधी मिळाली. यानंतर दिग्दर्शक रामा नायडू यांनी तिची निवड सिवाया, स्पीड डान्सर यासारख्या चित्रपटांकरता केली. 1995 मध्येच मोनिकाला सुरक्षा या हिंदी चित्रपटाची संधी मिळाली होती.
सालेमवर मुग्ध
चित्रपटांपेक्षा अधिक मोनिकाचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत राहिले. एका स्टेज शोदरम्यान तिची भेट अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमशी झाली, सालेमला पाहताच मोनिका त्याच्यावर फिदा झाली. पुढील काळात दोघेही एकत्र राहू लागले आणि दोघांनी विवाह केल्याचेही बोलले जाते.
4 वर्षे तुरुंगात
2006 साली मोनिकाला सालेमसोबत बनावट पारपत्रांसह पोर्तुगालमध्ये पकडण्यात आले होते. अबूसोबत संबंध ठेवणे मोनिकाला चांगलेच महागात पडले, तिची कारकीर्द जवळपास उद्ध्वस्त झाली. 2010 साली तुरुंगातून बाहेर पडलेली मोनिका आता परत चित्रपट आणि टीव्हीवर काम करण्याच्या प्रयत्नात आहे.









