दुबई / वृत्तसंस्था
भारताचा आघाडीचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन व यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत यांना आयसीसीतर्फे नव्याने जाहीर केल्या गेलेल्या महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. अश्विन व पंतशिवाय, मोहम्मद सिराज, टी. नटराजन हे देखील शर्यतीत आहेत. या सर्वांचा ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कसोटी विजयात मोलाचा वाटा राहिला आहे.
सदर भारतीय खेळाडूंसह इंग्लिश कर्णधार जो रुट, स्टार ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ, अफगाणिस्तानचा रहमानुल्लाह गुरबाझ, मारिझेन कॅप्प, दक्षिण आफ्रिकेचा नॅदिने डे क्लर्क व पाकिस्तानी महिला क्रिकेटपटू निदा दार यांनाही नामांकन लाभले आहे. जानेवारीत सर्व प्रकारात खेळवल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी चाहते आपल्या पसंतीच्या पुरुष व महिला क्रिकेटपटूंना ऑनलाईन मतदान करु शकतात.
चाहत्यांबरोबरच माजी कर्णधार, ब्रॉडकास्टर्स व क्रीडा पत्रकारांचा समावेश असलेल्या आयसीसी व्होटिंग अकादमीची मते यावेळी विचारात घेतली जाणार आहेत. व्होटिंग अकादमी ईमेलवरुन आपली मते नोंदवेल. चाहत्यांना आयसीसीच्या वेबसाईटवरुन आपल्या पसंतीचे खेळाडू निवडता येणार आहेत. या पुरस्काराचे विजेते प्रत्येक महिन्याच्या दुसऱया सोमवारी जाहीर केले जाणार आहेत.









