दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली कसोटी -दुसऱया दिवसअखेर पाकिस्तानची 8 बाद 308 धावांपर्यंत मजल
कराची / वृत्तसंस्था
35 वर्षीय फवाद आलमने 245 चेंडूत 9 चौकार व 2 षटकारांसह 109 धावांची शानदार खेळी साकारल्यानंतर पाकिस्तानने पाहुण्या दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱया दिवसअखेर 8 बाद 308 धावा जमवत 88 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. फवादचे कसोटी क्रिकेटमधील हे तिसरे शतक असून त्याला फहीम अश्रफने (84 चेंडूत 64) समयोचित साथ दिली. या लढतीत दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद 220 केल्या. त्यानंतर पाकिस्तानने आघाडी संपादन केली.
शतकवीर फवाद व अर्धशतकवीर फहीम यांनी सातव्या गडय़ासाठी 102 धावांची भागीदारी साकारली, हे पाकिस्तानच्या डावाचे ठळक वैशिष्टय़ ठरले. पदार्पणवीर नौमन अली 6 तर हसन अली 11 धावांवर नाबाद राहिले. अपारंपरिक शैलीने, तिन्ही स्टम्प सोडून फलंदाजी करणाऱया शतकवीर फवादने लुंगी एन्गिडीच्या (2-55) गोलंदाजीवर मिडविकेटवरील बवुमाकडे सोपा झेल देण्यापूर्वी आफ्रिकन गोलंदाजांवर उत्तम वर्चस्व गाजवले. फवाद 353 मिनिटे खेळपट्टीवर ठाण मांडून उभा राहिला.
दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 220 धावांवर गुंडाळल्यानंतर पाकिस्तानचा संघ एकवेळ 4 बाद 33 अशा अतिशय बिकट स्थितीत होता. पहिल्या दिवशी येथे 14 फलंदाज गारद झाले होते. पण, आलमने धीरोदात्त, संयमी फलंदाजी साकारली. फवादने 2009 मध्ये लंकेविरुद्ध पदार्पणात शतक झळकावले होते. पण, त्यानंतर त्याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. अखेर गतवर्षी इंग्लंडविरुद्ध त्याला पुनरागमनाची संधी मिळाली आणि मागील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध त्याने दुसरे शतक साजरे केले. 11 वर्षानंतर त्याचे हे दुसरे शतक ठरले होते.
बुधवारी फवाद आलमने येथील लढतीच्या दुसऱया दिवशी अझहर अलीसमवेत (51) पाचव्या गडय़ासाठी 94 धावा जोडल्या. अझहर अली डावखुरा फिरकीपटू केशव महाराजच्या गोलंदाजीवर यष्टीमागे झेल देत तंबूत परतला. एन्गिडीने बाद करण्यापूर्वी मोहम्मद रिझवानने 33 धावा जमवल्या. नंतर आलमने महाराजच्या गोलंदाजीवर आपले शतक साजरे केले. फहीम अश्रफने (84 चेंडूत 64) रबाडाच्या (2-45) गोलंदाजीवर दोन खणखणीत चौकार वसूल केले. मात्र, पुढील षटकात ऍनरिच नोर्त्जेचा चेंडू यष्टीवर ओढवून घेत तो बाद झाला.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका पहिला डाव ः 69.2 षटकात सर्वबाद 220 (डीन एल्गार 106 चेंडूत 9 चौकारांसह 58, जॉर्ज लिंडे 64 चेंडूत 5 चौकारांसह 35, कॅगिसो रबाडा 36 चेंडूत नाबाद 21. यासीर शाह 3-54, नौमन अली 2-38, शाहीन शाह आफ्रिदी 2-49, हसन अली 1-61)
पाकिस्तान पहिला डाव ः 107 षटकात 8 बाद 308 (फवाद आलम 245 चेंडूत 9 चौकार, 2 षटकारांसह 109, फहीम अश्रफ 84 चेंडूत 9 चौकारांसह 64, अझहर अली 51, मोहम्मद रिझवान 33. रबाडा, नोर्त्जे, एन्गिडी व केशव महाराज प्रत्येकी 2 बळी).









