4 राज्यांच्या पक्षसंघटनेत मोठे बदल
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेसच्या अनेक असंतुष्ट नेत्यांसोबत शनिवारी पक्षशेष्ठींच्या झालेल्या बैठकीनंतर 4 राज्यांच्या संघटनेत फेरबदलाची सुरुवात झाली आहे. प्रारंभिक काळात तेलंगणा, गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात पक्षाकडून बदल केले जाणार आहेत. यानुसार तेलंगणा काँग्रेस अध्यक्ष उत्तमकुमार रेड्डी यांनी ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला आहे.
याचबरोबर गुजरात काँग्रेस अध्यक्ष अमित चावडा यांनीही निवडणुकांमधील पक्षाच्या खराब कामगिरीनंतर राजीनामा दिला आहे. काही राज्यांमध्ये पुढील काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकांकरिता काँग्रेसने तयारी चालविली आहे.
तेलंगणा, पंजाब आणि गुजरातमधील काँग्रेस समितीत लवकरच मोठे बदल होऊ शकतात. या राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षही बदलले जाऊ शकतात. पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी अनेक नेत्यांशी चर्चा केली होती. यावेळी अनेक नेत्यांनी पक्षात अंतर्गत पातळीवर सुधारणा करण्याची सूचना केली होती.
काँग्रेसने शनिवारी मुंबई काँग्रेस समितीत बदल केला होता. भाई जगताप यांच्याकडे मुंबई काँग्रेसची धुरा देण्यात आली आहे. जगताप यांच्यासोबत अनुभवी टीमही देण्यात आली आहे. चरणजीत सिंग सप्रा यांची कार्याध्यक्षपदी, माजी मंत्री नसीम खान यांची प्रचार समिती प्रमुखपदी तर सुरेश शेट्टी यांची जाहीरनामा प्रमुखपदी वर्णी लावण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर पुन्हा विश्वास दाखविण्यात आला आहे. थोरात यांच्या नेतृत्वात मुंबई काँग्रेससाठी छाननी समिती आणि आगामी महापालिका निवडणुकीसाठी रणनिती ठरविण्याकरिता समिती स्थापन करण्यात आली आहे.
प्रभारी महासचिव
सोनिया गांधी यांनी आसाम आणि केरळसाठी तीन अखिल भारतीय काँग्रेस समिती सचिव नियुक्त केले आहेत. पुढील वर्षात या दोन्ही राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे. आसामसाठी जितेंद्र सिंग तर केरळसाठी तारिक अन्वर यांना प्रभारी महासचिवपद देण्यात आले आहे.
अंतर्गत मतभेदांची पार्श्वभूमी सोनिया गांधी यांनी शनिवारी काँग्रेसच्या नाराज नेत्यांसोबत सुमारे 5 तास चर्चा केली होती. या चर्चेवेळी राहुल गांधी आणि प्रियंका वड्राही उपस्थित होत्या. बैठकीत पक्षनेत्यांच्या तक्रारी, आगामी निवडणुकांसाठीची रणनिती आणि नव्या पक्षाध्यक्षासंबंधी चर्चा झाली आहे. लवकरच एक चिंतन शिबिर आयोजित करून पक्षाचे नेते यात पुढील वाटचालीसंबंधी चर्चा करणार आहेत. बैठकीत राहुल गांधी यांनी स्वतःची भूमिका मांडून नाराज नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.









