पाक पंतप्रधान इम्रान खान यांना भीती
इस्लामाबाद/ वृत्तसंस्था
पाकिस्तानच्या विदेशमंत्र्यांपासून पंतप्रधानांची विधाने पाहता तेथील सरकार भारताला घाबरून असल्याचे जाणवते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका मागोमाग एक अनेक ट्विट करत आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताच्या कथित ‘सर्जिकल स्ट्राइक’च्या विरोधात साद घातली आहे. यापूर्वी विदेशमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी भारत पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करण्याची योजना आखत असल्याचे पुरावे असल्याचा दावा अबुधाबी येथे बोलताना केला होता.
भारताने पाकिस्तानच्या विरोधात बनावट फ्लॅग ऑपरेशन केल्यास त्याला पाकिस्तानी इच्छाशक्तीकडून ठोस प्रत्युत्तर मिळेल, प्रत्येक स्तरावरील धोक्याचे प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचे आंतरराष्ट्रीय समुदायाला सांगू इच्छितो असा कांगावा इम्रान यांनी रविवारी ट्विटद्वारे केला आहे. भारताच्या अंतर्गत मुद्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकार पाकिस्तानच्या विरोधात बनावट मोहीम चालवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.









