पारंपरिक पद्धतीने गौरीचे स्वागत : महिला-युवतींमध्ये उत्साहाचे वातावरण
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सवातील गौराईचे स्वागत हा सोहळा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शुक्रवारी गणरायाचे आगमन झाल्यानंतर रविवारी सकाळपासून गौराईला आपल्या घरी विराजमान करण्यासाठी महिलांची लगबग सुरू होती. विहीर, तलाव अथवा मंदिरांशेजारीच गौराईचे पूजन करुन तेथून घरी सोनं पावलांनी गौराईला घरी नेण्याचा विधी पार पडला. कुमारीका तसेच सुवासिनींच्या हस्ते गौराईचे सोनं पावलांनी घरात पूजन करण्यात आले. त्यामुळे महिलांसह युवतीमध्ये उत्साह संचारल्याचे पहायला मिळाले.
गौरीच्या स्वागतासाठी गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती. आकर्षक मुखवटय़ांना विशेष मागणी असल्याचे दिसून आले. रविवारी सकाळपासून महिला व युवती गौरीच्या स्वागताची तयारी करत होत्या. गौराईचे विधीवत पूजा व औक्षण करून स्वागत करण्यात येत होते.
सासरी गेलेल्या मुलीचे माहेरी येताच ज्याप्रमाणे स्वागत होते, त्याचप्रमाणे गौरीचे स्वागत करण्याची परंपरा जोपासली जाते. रविवारी आलेल्या गौरीचे सोमवारी आणि मंगळवारी पूजन होणार आहे. यानंतर गणराया सोबत विसर्जन होणार आहे.









