निवडणूक अधिकाऱयांच्या बैठकीत होणार चित्र स्पष्ट : सर्टिफाईड मतदारयादी घेण्यासाठी मनपामध्ये उमेदवारांची गर्दी
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिका निवडणुकीबाबत व्यवस्थित माहिती मिळत नसल्याने उमेदवारी अर्जासोबत जोडण्यात येणाऱया कागदपत्रांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सूचकांची नो डय़ूज आणि सर्टिफाईड मतदारयादी घेण्यासाठी महापालिका कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली होती. वास्तविक प्रत्येक विभागाचे निवडणूक अधिकारी विभिन्न माहिती देत असल्याने उमेदवारांना धावपळ करावी लागत आहे.
उमेदवारी अर्जासोबत नो डय़ूज सर्टिफिकेट जोडणे बंधनकारक आहे. मात्र सूचकाचेही नो डय़ूज सर्टिफिकेट सक्तीचे असल्याचे सांगण्यात आल्याने उमेदवारी अर्ज भरणाऱयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. उमेदवारी अर्जासोबत विविध कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार कागदपत्रे जमविण्यासाठी धावपळ करीत आहेत. पण काही उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱयांकडे कागदपत्रांची विचारणा केली असता उमेदवार आणि सूचकांचेही नो डय़ूज प्रमाणपत्र लागणार असल्याची माहिती दिली. केवळ उमेदवाराचे नो डय़ूज सर्टिफिकेट जोडावे लागणार, अशी माहिती काही निवडणूक अधिकाऱयांनी दिली. त्यामुळे सर्वच उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
आज निवडणूक अधिकाऱयांची बैठक
निवडणूक अधिकारी विभिन्न माहिती देत असल्याने उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. काही निवडणूक अधिकाऱयांनी कागदपत्रांची यादी नोटीस फलकावर लावली आहे. उमेदवारी अर्ज अवैध ठरू नये, यासाठी सर्वच उमेदवारांनी सूचकांचे नो डय़ूज सर्टिफिकेट मिळविण्यासाठी धावपळ चालविली आहे. त्यामुळे महापालिका आणि पाणीपुरवठा कार्यालयात गर्दी होत आहे. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱयांकडे चौकशी केली असता निवडणूक माहिती पत्रकात सूचकांच्या नो डय़ूज सर्टिफिकेटबद्दल कोणतीच माहिती नाही. त्यामुळे शुक्रवार दि. 20 रोजी सर्व निवडणूक अधिकाऱयांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीवेळी सूचकांच्या नो डय़ूज सर्टिफिकेट जोडणेबाबत स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले.
रहिवासी असलेल्या वॉर्ड व्यतिरिक्त शेजारील वॉर्डमधून निवडणूक लढविण्याकरिता उमेदवारी अर्ज दाखल केल्यास उमेदवारी अर्जासोबत मतदारयादीची नक्कलप्रत जोडणे बंधनकारक आहे. मात्र याबाबतही इच्छुक उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून, सर्वच इच्छुक उमेदवार मतदारयादीची सर्टिफाईड कॉपी मिळविण्यासाठी धावपळ करीत आहेत. सर्वांनीच सर्टिफाईड कॉपीसाठी मनपा कार्यालयात गर्दी केल्याने गुरुवारी गोंधळ उडाला होता. प्रत्येकजण सर्टिफाईड कॉपीची मागणी करीत असल्याने मनपा प्रशासनाची धांदल उडाली आहे.
वास्तविक पाहता गरज नसतानाही प्रत्येक इच्छुक उमेदवार मतदारयादीची सर्टिफाईड कॉपी मिळविण्यासाठी मनपा कार्यालयात ठाण मांडून बसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याबाबत निवडणूक अधिकाऱयांकडे विचारणा केली असता रहिवासी असलेल्या वॉर्ड व्यतिरिक्त अन्य वॉर्डातून निवडणूक लढविल्यास मतदारयादीची सर्टिफाईड कॉपी लागणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक वॉर्डची मतदारयादी त्या-त्या निवडणूक अधिकाऱयांकडे आहे. पण अन्य वॉर्डातील मतदाराने उमेदवारी अर्ज दाखल केल्यास मतदारयादीमध्ये नाव उपलब्ध होणार नाही. त्याकरिता त्याची पडताळणी करण्याकरिता मतदारयादीच्या सर्टिफाईड कॉपीची प्रत उमेदवारी अर्जासोबत जोडावी लागते, असे सांगण्यात आले. त्यामुळे गरज नसतानाही सर्टिफाईड कॉपी मिळविण्यासाठी धावपळ करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.









