प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावसह देशाची शान असणाऱया मराठा लाईट इन्फंट्री येथे देशातील सर्वाधिक उंचीचा अशोक स्तंभ उभारण्यात येणार आहे. यामुळे इन्फंट्रीच्या आणि बेळगावच्या गौरवशाली परंपरेत मानाचा तुरा रोवला जाणार आहे. सदर अशोक स्तंभ 21 फूट उंचीचा असून तो सर्वाधिक उंचीचा ठरणार आहे. यापूर्वीचा स्तंभ 18 फूट उंचीचा आहे. मंगळवारी संध्याकाळी हा स्तंभ जोधपूरहून बेळगावच्या दिशेने निघाला आहे.
विशेष म्हणजे 18 फूट उंचीचा आणि इन्फंट्रीत उभा केला जाणारा 21 फुटी अशोक स्तंभ हे दोन्ही जोधपूरच्या शिकारगड येथील वर्कशॉपमध्ये तयार झाले आहेत. हे स्तंभ साकारण्यासाठी शिल्पकार रणजीतसिंह राठोड यांनी सलग सहा महिने अथक परिश्रम घेतले आहेत. त्यांनी तयार केलेल्या इतर अनेक शिल्पाकृती ‘वॉर म्युझियम’मध्ये ठेवण्यात आल्या आहेत.
सदर स्तंभ तीन भागात तयार करण्यात आला आहे. एका मोठय़ा पिलरवर तो बसविला जाईल. त्याच्या तळाच्या बाजूचा भाग वेगळा असून तो साडेपाच फुटांचा आहे. अशोक चक्र आणि गाय यांची प्रतिमा रेखाटलेला भाग साडेचार फुटांचा आहे. तर स्तंभावरील चारही सिंहांच्या प्रतिमांची उंची 11 फुटांची आहे. या स्तंभावर अत्यंत कुशल अशी कारागिरी करण्यात आली आहे. यासाठी अंदाजे चार लाख रुपये खर्च आला आहे.
सोनेरी रंगाच्या या स्तंभावर वातावरणाचा कोणताही परिणाम होणार नाही. कारण फायबरच्या साहाय्याने तो बनविण्यात आला आहे. हा स्तंभ तयार करण्यासाठी 20 ते 25 कारागिरांची मदत झाली आहे. रणजीतसिंह यांचे वडील करणसिंह यांनी हा स्तंभ तयार होत असताना पूर्ण देखरेख करून सूचना दिल्या आहेत. स्तंभ लवकरच मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये दाखल होणार आहे.









