सुन्चेऑन (दक्षिण कोरिया)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या विद्यमाने येथे सुरू झालेल्या कोरिया खुल्या आंतरराष्ट्रीय पुरूष आणि महिलांच्या 2022 बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधू, किदांबी श्रीकांत यांनी एकेरीत विजयी सलामी देत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. त्याचप्रमाणे पुरूष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी त्याचप्रमाणे एम.आर.अर्जुन आणि धृव कपिला यांनी दुसऱया फेरीत स्थान मिळविले.
महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात भारताच्या तृतीय मानांकित पीव्ही सिंधूने अमेरिकेच्या लॉरेन लॅमचा 34 मिनिटाच्या कालावधीत 21-15, 21-14 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. सिंधूने यापूर्वी सलग दोन ऑलिंपिक स्पर्धामध्ये भारताला पदक मिळवून दिले आहे. या लढतीतील पहिल्या गेममध्ये सिंधूने लॉरेनवर 11-6 अशी आघाडी मिळविली होती. त्यानंतर लॉरेनने आपल्या स्मॅश फटक्यावर आघाडी बरीच कमी केली. पण, सिंधूने हा पहिला गेम 21-15 असा जिंकला.
त्यानंतर दुसऱया गेमध्ये लॉरेनकडून सिंधूला फारसा कडवा प्रतिकार होवू शकला नाही. सिंधूने या दुसऱया गेममध्ये शेवटी सलग सहा गुण मिळवीत लॉरेनचे आव्हान संपुष्टात आणले. सुपर 500 दर्जाच्या या बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूचा पुढील फेरीतील सामना जपानच्या आया ओहोरीविरुद्ध होणार आहे. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील अन्य एका सामन्यात कोरियाच्या द्वितीय मानांकित सेयांगने भारताच्या श्रीकृष्णा प्रिया कुदरवल्लीचा 21-5, 21-13 असा पराभव केला.
पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात माजी टॉप सीडेड किदांबी श्रीकांतने मलेशियाच्या डरेन लियुचा 40 मिनिटांच्या कालावधीत 22-20, 21-11 अशा सरळ गेम्स्मध्ये फडशा पाडत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. पाचव्या मानांकित किदांबी श्रीकांतचा दुसऱया फेरीतील सामना इस्त्रायलच्या मिशा झिलबर्मनशी होणार आहे. पुरूष दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या तृतीय मानांकित जोडीने कोरियाच्या तेई यांग शिन आणि वेंग चेन यांचा 21-16, 21-15 असा पराभव करत विजयी सलामी दिली. पुरूष दुहेरीच्या पहिल्या फेरीतील अन्य एका सामन्यात एम.आर. अर्जुन आणि ध्रृव कपिला यांना कोरियाच्या किम आणि यांग पार्क यांच्याकडून पुढे चाल मिळाली. एकेरीत मंगळवारी भारताच्या लक्ष्य सेन आणि मालविका बनसूद यांनी दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला होता.









