कुणाला कशाचे कलेक्शन करण्याचे वेड असेल हे काही सांगता येत नाही. त्यात कलाकार मंडळी म्हटलं की मग अशा स्टाईलबाज गोष्टी तर त्यांच्या संग्रहात असायलाच पाहिजेत. अभिनेत्री श्रेया बुगडे हिच्याकडे कुठल्या अक्सेसरीजचे कलेक्शन आहे हे जर ऐकलं तर तुम्ही आश्चर्य व्यक्त कराल. श्रेया कुठे फिरायला जाते तिथे अर्थातच शॉपिंग करायला निघाली किती येताना वेगवेगळय़ा प्रकारचे गॉगल्स खरेदी करते आणि तिच्या गॉगल वेडामुळेच श्रेयाकडे वेगवेगळय़ा आकारांच्या, वेगळय़ा कलरटोनच्या गॉगल्सच्या प्रचंड व्हरायटी तिच्या कलेक्शनमध्ये आहेत. हे सगळे गॉगल ती फक्त तिच्या कपाटमध्ये ठेवत नाही तर त्या त्या गॉगलला शोभणारे ड्रेसिंग करत फोटो काढण्याची हौसही पूर्ण करते. श्रेयाच्या सोशल मीडिया पेजवर जर तुम्ही भटकंती केली तर तिच्या या गॉगल खजिन्याचा तुम्हाला नक्कीच प्रत्यय येईल.
चला हवा येऊ द्या या शोमधून कॉमेडीची क्वीन अशी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री श्रेया बुगडेला गॉगल्सचं प्रचंड वेड आहे. कुणाकडे फार तर तीन-चार गॉगल असू शकतात पण सध्या श्रेयाकडे शंभराहून अधिक वेगवेगळय़ा प्रकारचे गॉगल्स आहेत जे तिने कधी कामाच्या निमित्ताने किंवा भटकंतीच्या निमित्ताने वेगवेगळय़ा शहरातून खरेदी केले आहेत. इतकेच नव्हे तर त्यापैकी काही गॉगल्स ऑनलाईन शॉपिंग करून मागवले आहेत. कधीही मोबाईल बघत बसली आणि एखाद्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर जर तिला वेगळय़ाच प्रकारचा गॉगल नजरेस पडला की लगेच ती तो खरेदी करते. श्रेयाच्या कलेक्शनमध्ये चौकोनी, गोल या नेहमीच्या आकारासोबत हार्ट शेप, त्रिकोण, लंबगोल अशा वेगवेगळय़ा प्रेमच्या आकाराचे गॉगल आहेत. कलर टोन बाबत तिला जरी ब्राऊन कलर आवडत असला तरी बॉटल ग्रीन, ग्रे, ब्लॅक मस्टर्ड यलो या वेगवेगळय़ा ग्लास कलरचे गॉगल्स श्रेयाच्या संग्रहात आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी श्रेयाने घातलेल्या त्रिकोणी आकाराच्या प्रेमचा गॉगल तुफान हिट झाला होता. तिच्या या गॉगल कलेक्शन आणि गॉगल मधल्या वेगवेगळय़ा फोटोचे तिचे चाहते नेहमीच कौतुकही करत असतात. तिच्या अनोख्या छंदाबद्दल श्रेया सांगते की, प्रत्येक व्यक्तीला गॉगल घालायला आवडत असतो आणि इतकेच नव्हे तर प्रत्येकाच्या कलेक्शनमध्ये तीन-चार गॉगल तर नक्कीच असतात. मला ही अशीच गॉगलची आवड निर्माण झाली ती उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून आपले डोळे सुरक्षित असावेत म्हणून. नंतर जेव्हा जेव्हा मी गॉगलची खरेदी करायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या प्रेममधले वैविध्य, रंगीत ग्लासचे वैविध्य आवडायला लागलं मी कुठेही फिरायला गेले की तिथे जाते तेव्हा पहिली खरेदी ही माझी गॉगलची असते.








