बेंगळुरात काँग्रेस नेत्यांशी खलबते : आज निर्णय अपेक्षित : आमदारकीचा दिला राजीनामा
प्रतिनिधी, वार्ताहर/ बेंगळूर, हुबळी
राज्य राजकारणात नाट्यामय घडामोडी घडत असून माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी देखील भाजपला रामराम ठोकला आहे. शेट्टर यांनी रविवारी सकाळीच आमदारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर थेट काँग्रेस नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर पक्षप्रवेशासाठी दबाव आणला. तर सोमवारी आपण निर्णय जाहीर करणार असल्याचे शेट्टर यांनी सांगितल्याचे समजते. त्यामुळे शेट्टर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? की, भाजपश्रेष्ठींच्या शब्दावर विश्वास ठेऊन पक्षातच राहणे पसंद करणार? याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.
भाजप नेत्यांनी हुबळी-धारवाड सेंट्रल मतदारसंघातून तिकीट न दिल्याने नाराज झालेल्या जगदीश शेट्टर यांनी बेंगळुरात काँग्रेस नेत्यांची भेट घेत चर्चा केली. ही बैठक ज्येष्ठ नेते शामनूर शिवशंकरप्पा यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी काँग्रेसचे राज्य प्रभारी रणदीप सुरजेवाला, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, माजी मंत्री एम. बी. पाटील, एस. एस. मल्लिकार्जुन व इतर नेते उपस्थित होते.
शनिवारी रात्री भाजप नेत्यांसमवेत झालेल्या चर्चेवेळी जगदीश शेट्टर यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी, राज्यसभा सदस्य बनविण्याची ग्वाही देण्यात आली. मात्र, नकार देत शेट्टर यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली होती. रविवारी सकाळी ते थेट शिरसीला गेले. तेथे विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांची भेट घेऊन आमदारपदाच्या राजीनाम्याचे पत्र सादर केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना भाजप नेत्यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. नंतर ते पुन्हा हुबळीला परतले.
विशेष विमानाने गाठले बेंगळूर
राजीमान्यानंतर दुपारी हुबळीला परत आलेल्या जगदीश शेट्टर यांनी समर्थकांशी चर्चा केली. नंतर ते विशेष विमानाने बेंगळूरला गेले. माजी मंत्री आणि प्रभावी काँग्रेस नेते शामनूर शिवशंकरप्पा यांच्या मुलाने शेट्टर यांच्यासाठी बेंगळूरला जाण्याकरिता हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. मात्र, ते विशेष विमानाने बेंगळूरला गेले. यावेळी त्यांच्यासमवेत धारवाड जिल्हा काँग्रेस नेते आणि डी. के. शिवकुमार यांचे निकटवर्तीय होते. सायंकाळी बेंगळूरमध्ये त्यांनी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली.
हुबळीत भाजप नेत्यांची गुप्त बैठक
निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे सतर्क झालेल्या भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हुबळीतील निवासस्थानी गुप्त बैठक घेतली. या बैठकीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, राज्य भाजप निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान, मंत्री गोविंद कारजोळ, माची मंत्री रमेश जारकीहोळी हे सहभागी होते. जगदीश शेट्टर यांच्या राजीनाम्यामुळे हुबळी-धारवाड सेंट्रलमधील राजकीय परिस्थिती कशी हाताळावी, कोणाला उमेदवारी द्यावी यासह विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली आहे.









