प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील शाहूपुरीतील अंजली कॉलनी ते गेंडामाळ रस्त्यावर कारमधून गुटखा वाहतूक करणाऱया संतोष अंकुश देवरुखे, (रा. डबेवाडी, ता. सातारा) यास ताब्यात घेवून त्याच्या कारमधील 1 लाख 59 हजार 875 रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्याची कामगिरी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली.
याबाबत अधिक माहिती अशी, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस नाईक अमित माने यांना सातारा शहरातील गेंडामाळ ते अंजली कॉलनी जाणारे रोडने एक इसम त्याच्या ओमनी कार क्रमांक एम. एच. 11 ए. डब्ल्यू.9413 मधून गुटखा सदृश्य मालाची वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली. डीबी पथकाने रात्री सव्वा आठच्या दरम्यान सापळा रचला असता तिथे संतोष देवरुखे कार घेवून आला. त्याच्या कारची झडती घेतली असता कारमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला अवैध गुटखा आढळून आला.
देवरुखे याच्या विरुध्द अन्न सुरक्षा अधिकारी इम्रान हवालदार यांनी तक्रार दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल हसन तडवी, पोलीस नाईक लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, कॉन्स्टेबल ओंकार यादव, मोहन पवार व अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी रोहन शहा, इम्रान हवालदार, अनिल पवार यांनी सहभाग घेतला.








