प्रतिनिधी/ बेळगाव
लहानपणापासून आपली वाढ होत असताना धर्मासह घरातील सर्व नातेवाईकांचे संस्कार आपल्यावर होत असतात आणि तो एकतर्फी संवाद असतो. संगीत, चित्रकला असा त्यावेळी जीवनाचा क्वचितच भाग होता. आपण शिकत मोठे होत जातो. फक्त खिशातील पाकिटाची नव्हे तर व्यक्तिमत्त्वाची श्रीमंती महत्त्वाची. सीएसआरच्या माध्यमातून आजकाल होणाऱया समाजसेवेच्या कितीतरी आधी टाटांनी समाजसेवा सुरू केली होती, असे विचार बेळगावचे ज्ये÷ शिक्षणतज्ञ राज बेळगावकर यांनी मांडले.
हिंदवाडी येथील श्री गुरुदेव रानडे मंदिरातील एसीपीआरअंतर्गत दर शनिवारी होणाऱया सत्संग व ध्यान कार्यक्रमात ‘मॅनेजमेन्टची फिलॉसॉफी’ या विषयावर ते बोलत होते. प्रारंभी गुरुदेव रानडेंची आरती व पूजेनंतर डॉ. संदीप नायर यांनी त्यांची ओळख करून दिली. किशोर काकडे यांनी ‘ईक ओंकार ही गुरबाणी’ प्रार्थना सादर केली.
राज बेळगावकर यांनी बदलती आर्थिक परिस्थिती-मन नेहमी उत्कृष्ट आठवणींना स्मरत असत-तत्त्वज्ञानाची पोथी बाहेर दैनंदिन जीवनातील गरज-आफ्रिकेतील मजुरांवरील अत्याचार पण त्यांना एकत्र बांधून ठेवणारं संगीत, नेहमी आपल्यापेक्षा अधिक सक्षम लोकांच्या सहवासात राहण्याने आपली होणारी ओळख, चुकांची कबुली देणे, आपल्या वागण्यात सातत्य बाळगणे, मनाची शांती, अमेझॉन, स्वीगी, ओला, आयपॉड या नव्या बदलांचा अभ्यास, आईची जीवनातील मुख्य भूमिका असे नानाविध विषय प्रभावीपणे मांडले. सचिव मारुती जिरली, गुरुदेव मंदिराचे विश्वस्त, प्राध्यापक, विवेकानंद केंद्र, फिन्सचे सदस्य, इतर उद्योजकमंडळी यावेळी उपस्थित होती.









