खडेबाजार पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
22 डिसेंबर रोजी स्टेशन रोडवर दोघा जणांवर तलवार हल्ला केल्याप्रकरणी खडेबाजार पोलिसांनी सोमवारी आणखी एका तरुणाला अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या 5 वर पोहोचली आहे.
ओंकार भाऊसाहेब मेणसे (वय 23, रा. सरस्वतीनगर, गणेशपूर) असे त्याचे नाव असून खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. 29 डिसेंबर रोजी प्रफुल्ल पाटील (वय 26, रा. चव्हाट गल्ली), रोहित रेणके (वय 23, रा. समर्थनगर), शैलेश जानगवळी (वय 24, रा. नानावाडी) या तिघा जणांना अटक करण्यात आली होती. सोमवारी ओंकारला अटक झाली आहे. निलेश काकतकर व शंकर बजंत्री या दोघा जणांवर तलवारीने हल्ला करण्यात आला होता.









