वार्ताहर/ रामदुर्ग
एका माथेफिरुने घरासमोरील दुचाकींना आग लावून फरार झाल्याची घटना शुक्रवार 17 रोजी मध्यरात्री रामदुर्ग शहरात घडली. दोन दुचाकींची जळून खाक झाल्या असून एका बोलेरोच्या चाकालाही आग लावण्यात आली आहे. आग लावलेल्या दुचाकी पल्सर व होंडा कंपनीच्या असून संशी एम. एम. व श्रीकांत पेढे अशी दुचाकी मालकांची नावे आहेत.
शहरातील पठकोट गल्लीतील संशी यांनी नुकताच 11 दिवसांपूर्वी पल्सर खरेदी केली होती. संशी व श्रीकांत पेढे यांनी आपल्या घरासमोर दुचाकी लावल्या होत्या. शुक्रवारी मध्यरात्री एका माथेफिरुने या दुचाकींना आग लावली. तसेच बोलेरोच्या एका चाकाला आग लावून शहरातील काही दुकानांच्या दरवाजानांही पेट्रोल ओतून आग लावण्याचा प्रयत्न केला. रामदुर्गचे पीएसआय आनंद डोणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद रामदुर्ग पोलिसात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.









