तिसऱया दिवशीही बंदराचा रस्ता बंद , प्रशासन बेफिकीर
प्रतिनिधी/ वास्को
मुरगाव बंदरातून बाहेर पडणारे कोळसा आणि बॉक्साईट खनिजवाहू ट्रक रोखून धरण्याचे आंदोलन शनिवारी तिसऱया दिवशीही चालूच राहिले. या आंदोलनामुळे बंदरातील बॉक्साईट खनिजाची वाहतूक ठप्प झालेली आहे. मात्र, हा प्रश्न प्रशासनाने अद्याप गांभीर्याने घेतलेला नाही.
गुरुवारी सकाळी मुरगाव मतदारसंघातील हेडलॅण्ड सडा व इतर भागातील युवकांनी रस्तामार्गे होणारी कोळसा आणि बॉक्साईट खनिजाची वाहतूक वास्के शहरातून होऊच नये, ही वाहतूक नवीन महामार्गावरून व्हावी अशी मागणी करीत मुरगाव बंदरातील गेट क्रमांक नऊवर आंदोलन सुरू केलेले आहे. त्यामुळे गेले तीन दिवस या बंदरातून बॉक्साईटवाहू ट्रक बाहेर पडू शकलेले नाहीत. याचा आर्थिक फटका या व्यवसायाशी संबंधित अनेक आस्थापनांना बसू लागलेला आहे. बंदरातील वाहतूक आंदोलक युवकांनी अडवलेली असली तरी प्रशासनाने हा विषय अद्याप गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. पोलीस केवळ गस्त ठेवण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे बंदराबाहेर आणि आतमध्ये परिस्थिती जैसे थे आहे. मुरगाव बंदरातील धक्क्यावर 1 लाख 79 हजार मेट्रीक टन बॉक्साईट खनिजाने भरलेले जहाज असून आंदोलनामुळे हे जहाज खाली करणे कठीण बनलेले आहे. त्यामुळे जहाजही अडकले आहे. या आंदोलनाचा परिणाम पुढील काही दिवसांत मुरगाव बंदरात येणाऱया बॉक्साईटवाहू जहाजांवर होण्याची शक्यता आहे.
गोव्यातून तसेच शेजारील राज्यातून बॉक्साईट खनिज वाहून नेण्यासाठी अनेक ट्रक बंदरात आलेले असून ते या आंदोलनामुळे अडकलेले आहेत. वास्कोचे आमदार दाजी साळकर व मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी आंदोलकांची भेट घ्यावी आणि ही माल वाहतूक वास्को शहरातून होणार नाही, असे आश्वासन देण्याची मागणी आंदोलक युवकांनी केलेली आहे. मात्र, आमदारांनी या मागणीला दाद दिलेली नाही.









