मुख्यमंत्री बोम्माई यांची माहिती : 5 एचपीपर्यंत मोफत वीज देणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
यंत्रमागावर काम करणाऱ्या विणकरांना विणकर सन्मान योजना, शून्य व्याजदराने 2 लाखांपर्यंत कर्ज, 5 एचपीपर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली आहे.
बेंगळूरमध्ये 48 व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. विणकरांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजिण्यात आली होती. विणकरांसाठी 2 लाख रुपयांपर्यंत शून्य व्याजदराने (बिनव्याजी) कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच तामिळनाडूच्या धर्तीवर 5 एचपीपर्यंतचे वीज कनेक्शन असणाऱ्या विणकरांच्या कारखान्यांना मोफत वीजपुरवठा करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
अनुदान 50 टक्क्यांपर्यंत वाढविणार
विणकरांना यंत्रमागासाठी 30 टक्के अनुदान दिले जात आहे. ते 50 टक्क्यांपर्यंत वाढविण्याची मागणी मान्य करण्यात आली. विणकर सन्मान योजनेंतर्गत 46 हजार हातमाग विणकरांच्या बँक खात्यावर डीबीटीमार्फत 5000 ऊपये जमा करण्यात आले आहेत. विणकरांचे वास्तव्य असलेल्या भागातील विणकरांना भोगवटा प्रमाणपत्र (ऑक्युपेन्सी सर्टिफिकेट) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घरात उद्योग करणाऱ्या विणकरांना ‘गृहोद्योग’ म्हणून मान्यता देऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीतून सूट देण्याचा आदेश जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
हातमाग महामंडळाकडून गणवेश पुरवठा
विणकर (हातमाग व वीज यंत्रमाग) निगमच्या उत्पादन क्षमतेनुसार विद्याविकास योजनेंतर्गत गणवेश पुरवठ्याचे प्रमाण निश्चित करून उर्वरित कापड खरेदीसाठी निविदा मागविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डिसेंबर महिन्यातच आदेश देऊन योग्य वेळेत गणवेश पुरवठ्याची व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आली आहे. विविध खात्यांच्या आवश्यक गणवेशापैकी 25 टक्के गणवेशाचा कापड हातमाग महामंडळामार्फत खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.









