कोरोना परिस्थितीमुळे पंतप्रधान मोदींपाठोपाठ घेतला निर्णय
मतदानाच्या शेवटच्या दोन टप्प्यांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या पश्चिम बंगालमध्ये चार सभा होतील, असे घोषित करण्यात आले आहे. तथापि, गुरुवारीच त्यांनी राज्याचा दौरा करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांच्या जाहीर सभा रद्द कराव्या लागल्या. त्यापाठोपाठ शुक्रवारी तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांनीही सर्व जाहीर सभा रद्द करण्याचा निर्णय घोषित केला आहे.
निवडणूक आयोगाने शुक्रवारीच पुढील दोन टप्प्यांसाठी अतिशय कठोर नियमावली घोषित केल्याने बॅनर्जींना सभा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. कोणत्याही जाहीर सभेत लोकांना मास्कशिवाय येण्याची अनुमती देऊ नये. तसेच सभेला 500 पेक्षा अधिक लोक उपस्थित असू नयेत, असे निर्बंध निवडणूक आयोगाने घातले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना जाहीर सभांचा विचार सोडून द्यावा लागला आहे. ममता बॅनर्जी यांनी गुरुवारपर्यंत जाहीर सभा घेतल्या. राज्यात कोरोना पसरविण्यास पंतप्रधान मोदी जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
पुढील दोन टप्प्यांमध्ये प्रामुख्याने राजधानी कोलकाता आणि आसपासच्या शहरी भागांमध्ये मतदान होणार आहे. हा पारंपरिकरीत्या तृणमूल काँग्रेसचा गड मानला जातो. तथापि, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने येथे काही प्रमाणात मुसंडी मारली होती. त्यामुळे ममता बॅनर्जींनी या भागावर अधिक लक्ष केंद्रित केले असून तृणमूल कार्यकर्ते व उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत. भाजपनेही हाच मार्ग अवलंबला आहे. शहरी भागातील मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्ये तृणमूलचा जोर दिसत असला तरी हिंदूबहुल मतदारसंघांमध्ये भाजपची कामगिरी कशी होते, याकडे अभ्यासकांचे लक्ष वेधले गेले आहे.









