हातात घालावयाच्या बांगडय़ांच्या उत्पादनामुळे सुहागनगरी म्हणून ओळखला जाणारा उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्हा आता धान्य उत्पादनाच्या संदर्भात आत्मनिर्भर बनण्याच्या मार्गावर आहे. या जिल्हय़ातील सर्व रेशन दुकानांमधून पुढील वर्षापासून जिल्हय़ात पिकवण्यात आलेले धान्यच वितरित करण्यात येणार आहे. कारण जिल्हय़ातील सर्वांना पुरेल इतकी महत्त्वाची धान्ये आता जिल्हय़ातच उत्पादित केली जात आहेत. गहू, तांदूळ, तुरीची डाळ, तेलबिया, सातू व इतर काही धान्ये यांचे उत्पादन जिल्हय़ातच घेतले जात आहे.

यंदाच्या वषी जून आणि जुलै महिन्यात ही आत्मनिर्भरता दिसून येणार आहे. या दोन महिन्यात जिल्हय़ाला लागणारे सर्व धान्य जिल्हय़ातच उत्पादित केले जाणार आहे. यंदाच्या खरीप हंगामानंतर जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणावर गव्हाची खरेदी जिल्हा प्रशासनाने केली असून ही पुरेशी असल्याचे सांगितले आहे. रेशनकार्डधारकांना प्रतिव्यक्ती 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ दिले जाणार आहेत. तर अंत्योदय कार्डांवर प्रत्येकी 20 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ दिला जाणार आहे. आतापर्यंत या जिल्हय़ाला लागणारे पुष्कळसे धान्य बाहेरच्या जिल्हय़ांमधून मागविण्यात येत होते. तथापि, स्थानिक प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून जिल्हय़ातच जिल्हय़ाला पुरेल इतके धान्य उत्पादित करण्याच्या दिशेने जोरदार आगेकूच केली आहे.









