प्रतिनिधी / कुडचडे
आपण कधीच वाढदिवस साजरा केलेला नाही. तरी या सोहळय़ाचे आयोजन करून आपल्याला शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचा आपण आभारी आहे. उर्वरित जगाबरोबर जेव्हा आपल्या उर्वरित देशात आणि त्यानंतर आपल्या राज्यात कोविडचे रुग्ण आढळू लागले तेव्हा राज्यात एक भयानक वातावरण निर्माण झाले होते. त्यात बऱयाच गोष्टी घडल्या. या सर्व घडामोडींत सगळय़ात चांगले कार्य आरोग्य खात्यातील, पोलीस खात्यातील कर्मचाऱयांनी केलेले आहे, असे उद्गार वीजमंत्री व कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी काढले.
आज दीड वर्ष व्हायला आले, तेव्हा सर्वांना महामारीसंबंधी वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे आज नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, पंच व आपल्यातर्फे या सर्व कोविड योद्धे म्हणून कार्य केलेल्यांना एक आठवण म्हणून प्रशस्तीपत्र देण्यात येत आहे. कारण या आधुनिक जगतात बऱयाच घटना होतात, पण काही काळानंतर त्यावर पांघरूण पडते. असे न होण्यासाठी व सर्वांजवळ याची एक आठवण असावी या हेतूने या सोहळय़ाचे आयोजन केले आहे, असे काब्राल यांनी सांगितले.
तसेच कुडचडेतील जनतेला आपण सांगू इच्छितो की, बऱयाच मतदारसंघांत वेगळी कोविड सेंटर्स घोषित करण्यात आली. पण कुडचडेत त्याप्रमाणे सोय नसल्यामुळे सध्या सर्वोदय स्कूलमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरणाचे आयोजन केलेले आहे. यात बऱयाच जणांनी पहिला डोस घेतला आहे व लवकरच दुसरा डोस देणे सुरू होणार आहे. सर्वांनी मनात कोणतेच अन्य विचार न आणता दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन काब्राल यांनी यावेळी केले. तसेच केपेचे उपअधीक्षक किरण पौडुवाल, कुडचडे पोलीस निरीक्षक रवींद्र देसाई व इतर पोलीस कर्मचाऱयांचे त्यांनी खास आभार मानले.
काब्राल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोविड महामारीत सेवा बजावलेले कुडचडे स्थानकातील पोलीस, वाहतूक पोलीस व सीआयडी शाखेमधील कर्मचारी यांचा कोविड योद्धे म्हणून सत्कार करण्यासाठी कुडचडे पोलीस स्थानक सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सदर कार्यक्रमात सुरुवातीला कुडचडे पोलीस स्थानक तसेच सर्व धर्म समभाव आणि निवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे मंत्री काब्राल यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी काब्राल यांच्या हितचिंतकांनी त्यांना पुष्प देऊन शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
यावेळी उपअधीक्षक पौडुवाल व निरीक्षक देसाई, अर्जुन सांगोडकर, दीपक पेडणेकर तसेच इतर वरिष्ठ अधिकारी मिळून एकूण 170 जणांचा शाल, प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, कुडचडेचे नगराध्यक्ष विश्वास सावंत, महिला मोर्चा अध्यक्षा रजनी नाईक, युवा मोर्चा अध्यक्ष सुरज परब, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धार्थ गावस देसाई व इतर नगरसेवक, नगरसेविका, पंच, सरपंच व इतर मान्यवर उपस्थित होते.









