मंत्री दीपक पाऊकर यांचे आवाहन : कुळे येथे खतांचे वाटप
प्रतिनिधी /धारबांदोडा
धारबांदोडा तालुका हा कृषीप्रधान भाग असून येथील पर्यावरण टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱयांचा मोठा वाटा आहे. शेतकऱयांनी आपल्या जमिनी कुठल्याच परिस्थितीत पडिक न ठेवता त्यात विविध प्रकारचे पिक घ्यावे. त्यासाठी सरकारच्या विविध योजना आहेत. खतांवर शेतकऱयांना सवलत मिळत नसल्याने त्यांना मदत करणे स्थानिक आमदार म्हणून आपले कर्तव्य आहे, असे उद्गार बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी काढले.
कुळे-शिगाव पंचायत क्षेत्रातील वाकीकुळण किसान सभा या शेतकरी संघटनेच्या सभासदांना खतांचे वाटप केल्यानंतर मंत्री पाऊसकर बोलत होते. शेतकरी संघटना व अन्य शेतकऱयांना मिळून साधारण एकोणनव्वद खतांच्या पोत्या वितरीत करण्यात आल्या. संघटनेचे सदस्य तथा माजी सरपंच शांताराम वेळीप यांनी केलेल्या मागणीनुसार नांगरणी व कापणीसाठी लागणाऱया यंत्रावरील पन्नास टक्के खर्च उचलण्यास आपली तयारी असल्याचे मंत्री पाऊसकर यांनी यावेळी जाहीर केले. शेतकऱयांनी समूहशेतीचा अवलंब करुन दुबार हंगामी पिक घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. येथील शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी रु. 1 कोटी 30 लाख खर्चून बंधारा बांधण्याचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर लगेच हे काम हाती घेण्यात येईल. औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी येत्या 15 जुलै रोजी काकोडा आयटीआय कॉलेजमध्ये जॉब फेअरचे आयोजन केले आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी धारबांदोडा विभागीय कृषी अधिकारी नागेश कोमरपंत, उपसरपंच खुशी वेळीप, पंचसदस्य मच्छिंद्र देसाई, निशा शिंगावकर, किसान सभेचे अध्यक्ष नरेश शिगावकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य माधवराव देसाई आदी उपस्थित होते. मंत्री पाऊसकर हे शेतकऱयांना नेहमीच प्रोत्साहन देतात. वाकीकुळण शेतकरी संघटनेला खत पुरवून त्यांनी केलेली मदत महत्त्वाची आहे, असे खुशी वेळीप म्हणाल्या. कुळेतील शेतकऱयांनी दुबार शेतीकडे वळण्याचे आवाहन नागेश कोमरपंत यांनी केले. कृषी खात्यातर्फे शेतकऱयांना आवश्यक ती सर्वप्रकारची मदत केली जाईल. नरेश शिगावकर यांनी शेतकऱयांच्या विविध समस्या मंत्री पाऊसकर यांच्यासमोर मांडल्या. तसेच बंधारा लवकरात लवकर बांधून शेतीसाठी पाणी पुरवठय़ाची सोय करावी अशी मागणी केली. उमेश नाईक यांनी सूत्रसंचालन तर निशा शिंगावकर यांनी आभार मानले.









